माउलींच्या पादुकांना नीरा स्नान
By admin | Published: June 24, 2017 02:15 PM2017-06-24T14:15:18+5:302017-06-24T14:15:18+5:30
पंढरीचा वास चंद्रभागे स्रान, आणिक दर्शन विठोबाचे, हेचि घडो मज जन्मजन्मांतरी, मागणे श्रीहरी नाही दुजे
Next
>ऑनलाइन लोकमत
लोणंद (सातारा), दि. 24 - पंढरीचा वास चंद्रभागे स्रान, आणिक दर्शन विठोबाचे, हेचि घडो मज जन्मजन्मांतरी, मागणे श्रीहरी नाही दुजे... ही भावना उराशी बाळगून सावळ्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी निघालेले लाखो वारकरी, नभांगणी फडकणाऱ्या भगव्या पताका, टाळ-मृदंगाचा गगनभेदी निनाद, ज्ञानोबा-तुकारामाचा जयघोष अन देहभान विसरून नाचणारा वैष्णवांचा मेळा, अशा भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे ऐतिहासिक सातारा जिल्ह्यात नीरा तीरावर शनिवारी दुपारी उत्साहात स्वागत झाले.
माउलींच्या सहवासात पंढरीच्या विठुरायाची वारी पूर्ण करण्याची आस मनात बाळगून अवघ्या महाराष्ट्रातून आणि इतर राज्यातून लाखो वारकरी लोणंदनगरीत दाखल झाले. सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील नीरा नदीच्या तीरावर पालखीचे आगमन झाले.
यावेळी पालखीच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील मान्यवरांसह हजारो भाविक उपस्थित होते. नीरा नदीवरील पुलावर माउलींच्या पालखीचा रथ थांबल्यानंतर प्रथेप्रमाणे माउलींच्या पादुकांना स्रान घालण्यात आले.
पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी साताऱ्याचे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे पालखीचे सूत्र सुपूर्त केले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे देवानंद शिंदे, वाईचे प्रांताधिकारी अस्मिता मोरे, फलटणचे प्रातांधिकारी संतोष जाधव, खंडाळा तहसीलदार शिवाजीराव तळपे, फलटण तहसीलदार विजय पाटील, खंडाळा गटविकास अधिकारी दीपा बापट, आपत्ती व्यवस्थापन देविदास कामाने आदींची उपस्थिती होती.