'मर्सिडीज गिफ्ट' वादावरून नीलम गोऱ्हे अडचणीत; ठाकरे गटाच्या नेत्याने पाठवली नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 14:48 IST2025-02-27T14:36:45+5:302025-02-27T14:48:39+5:30
नीलम गोऱ्हे यांनी केलेले विधान अपमानजनक, बदनामीकारक आहेत. खळबळ उडवून देण्यासाठी अशी विधाने करणे दुर्दैवी आहे असंही नोटिशीत सांगितले आहे.

'मर्सिडीज गिफ्ट' वादावरून नीलम गोऱ्हे अडचणीत; ठाकरे गटाच्या नेत्याने पाठवली नोटीस
पुणे - उद्धव ठाकरे गटात २ मर्सिडीज दिल्यावर १ पद मिळते असं विधान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एका मुलाखतीत नीलम गोऱ्हे यांनी केले. नीलम गोऱ्हे यांच्या विधानावरून ठाकरे गट आक्रमक झाल्याचं दिसून आले. ठाकरे गटाने नीलम गोऱ्हेंवर पलटवार करत तुम्हाला आतापर्यंत ४ वेळा विधान परिषद दिली तेव्हा तुम्ही किती मर्सिडीज दिल्या असा सवाल विचारला. त्यानंतर आता ठाकरे गटाच्या नेत्याने नीलम गोऱ्हे यांना कायदेशीर नोटीस पाठवली असून उद्धव ठाकरेंचं प्रतिमा मलिन केल्याचा आरोप केला आहे.
रविवारी दिल्लीत सुरू असलेल्या मराठी साहित्य संमेलनात नीलम गोऱ्हे यांची मुलाखत घेतली. त्यावेळी गोऱ्हे यांनी नेत्यांना संपर्कच नको असेल तर आपण तिथे नकोसे झालोय हे समजावं. २ मर्सिडिज गाड्या मिळाल्यावर एक पद असं होते असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीवर गंभीर आरोप केले. त्यानंतर आता उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी वकील असीम सरोदे यांच्या माध्यमातून नीलम गोऱ्हे यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. इंडियन एक्सप्रेसनं याबाबत वृत्त दिले आहे.
या नोटीशीत काय म्हटलंय?
असीम सरोदे यांनी पाठवलेल्या नोटिशीत म्हटलंय की, ज्याअर्थी नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात मानहानीकारक विधान केले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासारख्या मोठ्या व्यासपीठावर त्यांचा अपमान करण्यात आला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात जे त्यांना मर्सिडीज गिफ्ट देतात त्यांनाच महत्त्वाची पदे मिळतात असा आरोप केला. यातून पक्षातील नियुक्त्या केवळ आर्थिक बळ दाखवल्यावरच मिळतात असं चित्र उभं करण्यात आले. हे सर्व चुकीचं आणि बिनबुडाचे विधान आहे. त्यातून उद्धव ठाकरे यांची प्रतिमा मलिन करण्यात आली असं सांगितले आहे.
नीलम गोऱ्हे यांचं हे विधान माध्यमांमध्ये दाखवण्यात आले त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या प्रतिमेला धक्का लागला. या संमेलनात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचेही भाषण झाले परंतु त्यात कुठलेही वादग्रस्त विधाने नाहीत. नीलम गोऱ्हे यांनी विनाकारण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला बदनाम करण्यासाठी साहित्य संमेलनासारखं व्यासपीठ निवडलं. या संमेलनाच्या आयोजकांनीही नीलम गोऱ्हे यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना किती मर्सिडीज कार भेट दिली, जर तुम्ही केलेल्या आरोपात तथ्य असेल तर त्या सर्व कारचे नोंदणी क्रमांक द्यावेत. उद्धव ठाकरे यांना भेट देणाऱ्या पक्षातील सदस्यांची नावे सांगावी, त्यांना कुठले पद मिळाले हे सांगावे असं कायदेशीर नोटिशीत म्हटलं आहे. नीलम गोऱ्हे यांनी केलेले विधान अपमानजनक, बदनामीकारक आहेत. खळबळ उडवून देण्यासाठी अशी विधाने करणे दुर्दैवी आहे असंही नोटिशीत सांगितले आहे.