असंघटित कामगारांच्या हक्कासाठी नीलम गो-हेंचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 08:01 PM2018-07-16T20:01:20+5:302018-07-16T20:01:34+5:30
राज्यातील घरकाम करणाऱ्या असंघटित महिला कामगारांसाठी कायदा असूनही त्याचा काहीच लाभ होत नसल्याने कामगारांच्या शिष्टमंडळाने आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर प्रश्न उपस्थित केले.
मुंबई : राज्यातील घरकाम करणाऱ्या असंघटित महिला कामगारांसाठी कायदा असूनही त्याचा काहीच लाभ होत नसल्याने कामगारांच्या शिष्टमंडळाने आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर प्रश्न उपस्थित केले. यावेळी नीलम गोऱ्हे यांनी आजच कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची भेट घेतली आणि त्यांच्यासमोर या कामगारांचे प्रश्न मांडले.
कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बैठक घेऊन यावर तोडगा काढू, असे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी १२२ विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या असंघटित कामगारांचा बोर्ड तयार करणार असल्याचे सांगितले. याचबरोबर, त्यांनी असंघटित कामगारांची ३ वर्षासाठी नोंदणी सुरू करू आणि ती नोंदणी क्लिष्ट नसून सोपी असेल थम रजिस्ट्रेश व एक ओळखपत्र यावर करता येणार आहे. तसेच घरकाम करणाऱ्या कामगारांच्या हितासाठी तीन विमास्कीम सुरू केल्याचे सांगितले, १)अपघात विमा, २) महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य विमा ३)आयुष्मान विमा आणि या विम्यासाठी कामगारांना काहीही पैसे भरावे लागणार नाहीत, ५०% राज्य सरकार व ५०% केंद्र सरकार भरणार आहेत. बंद पडलेल्या स्कीम १५ ऑगस्टपासून सुरु होणार असे तोंडी उत्तर दिले. तसेच, याविषयी अधिक माहितीसाठी आपण ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बैठक घेऊ असे आश्वासन दिले. यावेळी नीलम गोऱ्हे यांनी या कामात पारदर्शकता येण्यासाठी घरकामगारांची सल्लागार समिती गठीत करावी अशी मागणी केली. या मागणीचाही विचार पुढील बैठकीत करू असेही निलंगेकर म्हणाले.
महाराष्ट्र सरकारने २००८ मध्ये महाराष्ट्र राज्य घरेलु कल्याण मंडळ कायदा २००८ लागू केला २०११ साली मंडळाची स्थापना केली. मात्र हे मंडळ २०१५ मध्ये बरखास्त झाले. त्यामुळे अनेक घरकाम करणाऱ्या महिला सरकारी लाभापासून दूरच राहिल्या आहेत. तसेच महिला कामगार यांची सुरक्षितता, आधारकार्ड लिंक करण्याची सक्ती न करता त्यातून मध्यवर्ती मार्ग काढावा. घरकामगार महिलांचे कामाचे प्रश्न हे त्यांच्या मालकांशी संबधित असल्याने मालकांची नोंदणी होणे गरजेचे आहे. घरकाम करणाऱ्या कामगारांचे शासनाने किमान वेतन ठरवावे. घरकामगार महिलांना निवृत्तीनंतर किमान ३ हजार रुपये निवृत्ती वेतन ठरवावे, असे प्रश्न यावेळी कामगार शिष्टमंडळाने उपस्थित केले.
यावेळी महिला कामगार राज्य समन्वयक ज्ञानेश पाटील, पुष्पा लुईस, निर्मला कुंजुर, कुळकांडताई कंगाले, दिनेश मिश्रा हे उपस्थित होते.