कुजबुज: 'तो' फोन उद्धव ठाकरेंना द्यायचा की नाही हे मिलिंद नार्वेकर ठरवतात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 06:37 AM2023-09-17T06:37:33+5:302023-09-17T06:38:12+5:30
थेट गणेश भक्तांच्या भावनांना हात घालत गणेश मूर्ती पीओपी की शाडूच्या मातीची ते दर्शवणारा सांकेतिक शिक्का मूर्तींवर न मारण्याचे आदेश महापालिका प्रशासनामार्फत मूर्तिकारांना दिले.
नेत्यापेक्षा ‘पीए’ भला!
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपल्या गप्पांचे पुस्तक प्रसिद्ध केले. मात्र, त्यातील काही गप्पांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची साथ सोडताना उद्धव यांच्याशी गेल्या काही वर्षांत संवाद होत नव्हता, असे सांगत नाक मुरडले होते. पण, उद्धव यांचा फोन ज्या खासगी सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याकडे असतो व उद्धव यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून जे तो फोन उद्धव यांना द्यायचा की नाही हे ठरवतात, त्या नार्वेकर यांची चक्क नीलमताईंनी स्तुती केली. नार्वेकर हे अजब रसायन आहे. उद्धव यांच्या मनात काय आहे ते मिलिंद यांना बरोबर कळते. (रश्मी वहिनी कान देऊन ऐका) उद्धव यांनी सूचना देण्यापूर्वी मिलिंद कृती करून मोकळे होतात. अगोदर मला मिलिंद आगाऊ वाटायचे, पण ते मनकवडे आहेत.
गणेशोत्सवातून भाजपचा प्रचार
आगामी पालिका निवडणुका पाहता दहीहंडी उत्सवात भाजप, शिवसेना, मनसे व इतर पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात आला. इतर पक्षांच्या तुलनेत भाजप आघाडीवर होते. आता गणेशोत्सव तोंडावर आला असून विविध सार्वजनिक मंडळे हाताशी धरून भाजपने प्रचाराचा श्रीगणेशा केला आहे. भाजप नेते व मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी तर थेट गणेश भक्तांच्या भावनांना हात घालत गणेश मूर्ती पीओपी की शाडूच्या मातीची ते दर्शवणारा सांकेतिक शिक्का मूर्तींवर न मारण्याचे आदेश महापालिका प्रशासनामार्फत मूर्तिकारांना दिले. या उठाठेवींमुळे भाजपचा प्रचार सुरू असल्याचे दिसत आहे मात्र शिवसेना व इतर पक्षांचे काय ते कसा प्रचार करणार अशी चर्चा मुंबईकरांमध्ये सुरू आहे.
दोन गायकवाडांची खडाखडी इथेही...
राज्यातील सत्तेत एकमेकांना साथ देणाऱ्या भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांच्यात कल्याण पूर्वेतील खडाखडी सुरू आहे. कल्याण पश्चिमेच्या तुलनेत पूर्वेकडील भाग अनेक नागरी समस्यांनी वेढला गेलेला आहे. परंतु, सत्तेत असलेले शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड आणि भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्यामधील वाद कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढविणारा आणि नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. कोरोनामुळे लांबलेल्या निवडणुका लवकरच लागतील, असे संकेत मिळत आहेत; पण दोघा गायकवाडांमधील वादाचा सिलसिला कायम राहिला तर युती म्हणून कोणत्या तोंडाने नागरिकांसमोर जायचे, अशी चर्चा सामान्य कार्यकर्त्यांमध्ये आहे. दोघांच्या भांडणाचा विरोधकांना फायदा होण्याची दाट शक्यता आहे.