बाजारबुणगे अन् शिवसैनिकांमध्ये फरक; नीलम गोऱ्हेंचा शिंदे गटाला टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2022 02:49 PM2022-09-30T14:49:49+5:302022-09-30T14:51:41+5:30
दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी शिंदे गटाकडून शासकीय यंत्रणेचा वापर, पंढरपुरात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा आरोप
पंढरपूर - शासकीय यंत्रणेचा फायदा घेऊन दसरा मेळाव्याला शिंदे गट गर्दी करणार असल्याचे मत महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले आहे. शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याला येणारे लोक हे मनाने येतात. इतर मेळाव्यात कोणी कितीही लोकांच्या संख्येचे दावे करू देत पण बाजारबुणगे आणि शिवसैनिक यामध्ये फरक आहे असा टोला त्यांनी लगावला.
विठ्ठलाच्या दर्शनासाठी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे या पंढरपूर येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, लोक मनाने आलेले असावेत. आणलेली नसावेत, पळून जाण्याच्या पवित्र्यात नसावीत. कायद्याच्या भीतीने, इडीच्या भीतीने, सीबीआयच्या भीतीने आले नसावेत. पोलिसांनी तडीपारचे आदेश काढलेल्या भीतीने आलेले सैनिक नसावेत. शिवसेना गट सोडून गेलेल्या आमदारांनी मंत्री पद मिळणार म्हणून सचिव, ड्रायव्हर शोधून ठेवले होते. अधिकाऱ्याची बदली करण्याची तयारी करून ठेवली होती. पेढे आणून ठेवले होते. परंतु त्यांचं काय झालं त्यांना काहीच मिळाल नाही अशी खिल्ली देखील शिंदे गटातील आमदारांची गोऱ्हे यांनी उडवली आहे.
भाजपापासून दूर होणे योग्यच
शिवसेनेने भाजपाची युती तोडली. त्यावेळी भाजपाचे नेते पाठीत खंजीर खुपसला असे म्हणत होते. परंतु १५५ आमदार निवडून आणण्याची तयारी भाजपने ठेवली होती. ते त्यांनी शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठीच तयारी केली होती. त्यामुळे शिवसेनेने घेतलेला निर्णय योग्य होता असे गोऱ्हे यांनी सांगितले.
राम कदम यांनी जावई शोध कोठून काढला
दसरा मेळावा गर्दी करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीचे मदत घेतल्याची आमदार राम कदम यांनी केले होते. यावर आ. राम कदम हरिश्चंद्र आहेत का ? त्यांच्याकडं काही पुरावा आहे का ? खोटे बोलून ठाकरे यांची लोकप्रियता कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महागाई वाढली आहे. स्वतः च अपयश झाकण्यासाठी ते चुकच्या टीका करत असल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले.
रामदास कदमंच्या विधानाचा शोध घेण्यासाठी सत्यशोधक समिती नेमण्याची गरज
शिवसेनेचे आणखी पाच आमदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती रामदास कदम यांनी सांगितली होती.रामदास कदम यांचे विधानाचा शोध घेण्यासाठी सत्यशोधक समिती नेमण्याची गरज असल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले.