"शंभर टक्के तुला तिकीट देते असं सांगून पैसे घेतले अन्..."; माजी महापौरांचा नीलम गोऱ्हेंवर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 12:19 IST2025-02-24T12:19:07+5:302025-02-24T12:19:19+5:30
शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या आरोपांना माजी महापौर विनायक पांडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

"शंभर टक्के तुला तिकीट देते असं सांगून पैसे घेतले अन्..."; माजी महापौरांचा नीलम गोऱ्हेंवर आरोप
Neelam Gorhe : शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनात केलेल्या आरोपांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडिज गाड्या मिळाल्या की एक पद मिळतं ही वस्तुस्थिती आहे असा आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला होता. यावरुन आक्रमक झालेल्या ठाकरे गटाने गोऱ्हेंविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. निलम गोऱ्हेंनी गाड्यांच्या पावत्या त्यांनी आणून दाखवाव्यात, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं. दुसरीकडेच माजी महापौर विनायक पांडे यांनीही गोऱ्हे यांनी आपल्याकडून विधानसभा निवडणुकीच्या तिकीटासाठी पैसे घेतल्याचा आरोप केला आहे.
दिल्लीमध्ये आयोजित अखिल भारतीय साहित्य संमेलनात बोलताना शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला होता. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या, असा खळबळजनक दावा निलम गोऱ्हेंनी केला. यावरुन आक्रमक झालेल्या ठाकरे गटाकडून त्यांना प्रत्युत्तर देण्यात येत आहे. अशातच नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नीलम गोरे कार्यकर्त्यांना मातोश्री पर्यंत पोहोचू द्यायच्या नाहीत, असं पांडे यांनी म्हटलं.
"उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही पदासाठी माझ्याकडून एक रुपया मागितला नाही. मी चांगलं काम करत असल्याने त्यांनी मला सतत पदं दिली. माझ्याकडून त्यांनी एक पैसा सुद्धा घेतलेला नाही. पण विधानसभेच्या निवडणुकीत नीलम गोऱ्हे यांनी माझ्याकडून पैसे घेतले. माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते पुढे येतील आणि सांगतील की यांनी काय काय केलेलं आहे. पैशाच्या व्यवहाराशिवाय नीलम गोऱ्हे कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा नाहीत. नीलम गोरे कार्यकर्त्यांना मातोश्री पर्यंत पोहोचू द्यायच्या नाहीत. त्यांनी मला शंभर टक्के तुला तिकीट देते असं सांगितलं होतं. पण मला ते मिळालं नाही. ठाकरेंच्या इथे अशा गोष्टी घडत नाहीत. मातोश्री हे पवित्र स्थान आहे," असं विनायक पांडे यांनी म्हटलं.
"२०१४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी मी मध्य नाशिक मतदारसंघातून इच्छुक होतो. अजय बोरस्ते हे सुद्धा इच्छुक होते. आम्ही दोघेही तिकिटासाठी प्रयत्न करत होतो. त्यावेळी नीलम गोऱ्हेंचा एक कार्यकर्ता माझ्याकडे आला आणि त्याने मला नीलम गोऱ्हे त्यांच्याकडे नेलं. त्यावेळी नीलम गोऱ्हे यांनी तिकिटासाठी पैसे द्यावे लागतील असं सांगितलं. त्यावेळी मी काही पैसे पोहोचवले. त्यानंतर काही दिवसांनी अजय बोरस्ते यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे मी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र त्यांनी टाळाटाळ केल्यानंतर मी सांगितलं की एक दिवस पत्रकार परिषद घेऊन हा विषय मांडणार आहे. त्यानंतर त्यांनी मनोरा आमदार निवासावर बोलवून घेतलं. तिथे त्यांनी काही रक्कम दिली आणि काही पैसे कमी दिले," असा आरोप माजी महापौर विनायक पांडे यांनी केला.