Neelam Rane : नारायण राणेंवरील अटकेच्या कारवाईनंतर पहिल्यांदाच नीलम राणे बोलल्या; निलेश आणि नितेश यांनाही दिला सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 10:05 AM2021-08-30T10:05:44+5:302021-08-30T10:06:49+5:30
Neelam Rane : शिवसेनेकडून असे काही केले जाईल असे कधीच वाटले नव्हते, असे सांगत नीलम राणे यांनी नारायण राणेंवरील अटकेच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला, पण या घटनेचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटले. तसेच, या कारवाईचे पडसाद येत्या काळात उमटत राहणार आहेत. दरम्यान, याबाबत नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे यांनी पहिल्यांदाच आपले मत व्यक्त केले आहे.
शिवसेनेकडून असे काही केले जाईल असे कधीच वाटले नव्हते, असे सांगत त्यांनी नारायण राणेंवरील अटकेच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, नीलम राणे यांनी नीलेश राणे आणि नितेश राणे या दोन्ही मुलांना त्यांच्याकडून काय सल्ला दिला जातो, हेही त्यांनी स्पष्ट केले. त्या एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.
"माझे पती नारायण राणे यांनी आपल्या आयुष्यातील ४० वर्षे शिवसेना या पक्षासाठी दिली. जो पक्षाचा नेता राहिलेला आहे त्याच्यासोबत शिवसेना असे वागेल असे मला कधीच वाटले नव्हते. शिवसेना आज नारायण राणे यांच्याविरुद्ध जे काही करत आहे त्यावर काय बोलावे तेच समजत नाही", असे नीलम राणे म्हणाल्या.
स्वातंत्र्यदिनाबाबत मुख्यमंत्र्यांचे जे अज्ञान होते त्यावर राणे यांनी बोट ठेवले होते. त्यात काही गैर होते असे मला वाटत नाही. त्यावर अशी प्रतिक्रिया अपेक्षित नव्हती. आमच्या जुहू येथील घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. आम्ही घरात नव्हतो आणि माझी नातवंडं, सुना घरात असताना हा प्रकार केला गेला. त्याचे मला वाईट वाटले, असे सांगत नीलम राणे यांनी नाराजी व्यक्त केली.
घरावर चाल करून माणसे येतात तेव्हा त्यांना बेस उरलेला नाही असे वाटते. असे राजकारण याआधी कधीही झाले नाही. या थराला कुणी गेले नाही. भाजप आमच्या पाठिशी आहे. त्यामुळे पुन्हा असे काही होईल असे वाटत नाही, असे नीलम राणे म्हणाल्या. याचबरोबर, निलेश राणे आणि नितेश राणे या दोन्ही मुलांना तुम्ही काय सल्ला देता, असा प्रश्न विचारला असता नीलम राणे म्हणाल्या की, 'शांतपणे आपले काम केले पाहिजे असे मी त्यांना सांगत असते'.