‘नीरा डावा’ आवर्तनाचा फज्जा
By admin | Published: March 4, 2017 01:00 AM2017-03-04T01:00:56+5:302017-03-04T01:00:56+5:30
नीरा डाव्या कालव्याच्या वितरिका ५७ वर असणाऱ्या दारे सातमधील शेकडो लाभधारक शेतकऱ्यांना हक्काच्या पाण्याच्या आवर्तनाचा फज्जा उडाला
निमगाव केतकी : इंदापूर तालुक्यांतील नीरा डाव्या कालव्याच्या वितरिका ५७ वर असणाऱ्या दारे सातमधील शेकडो लाभधारक शेतकऱ्यांना हक्काच्या पाण्याच्या आवर्तनाचा फज्जा उडाला आहे. केवळ शाखाधिकारी व बीटधारक यांच्या ढिसाळ नियोजनामुळे पाणीवाटपाचा फज्जा उडाला आहे. याप्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी इंदापूर पंचायत समितीचे सभापती विलासराव वाघमोडे, इंदापूर तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक बबनराव देवकर, विकास संस्थेचे अध्यक्ष शांतिलाल देवकर यांनी
केली आहे.
पुणे पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत इंदापूर तालुक्यांतील गावांना पाणी मिळते. वितरिका ५७ वरील सातवे दारेपर्यंत पाणी गेलेच नाही. काही वेळ शेतक ऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी शाखा अधिकारी लक्ष्मणराव सुद्रिक यांनी हे दार
सुरू केले.
तसेच, लगेच बंद केले. या भागातील शेतकऱ्यांनी त्रागा व्यक्त केल्याने पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्याचे चक्क लेखी आश्वासन दिले. शेतकऱ्यांना सिंचन पूर्ण करण्यासाठी जबाबदारी माझी आहे, असेही लेखी शेतकऱ्यांना शाखाधिकारी यांनी दिले. मात्र, बोराटवाडी, खोरोची, रेडणी या भागात नियम मोडून पाणी शाखाधिकारी यांनी सोडले. त्यामुळे काटी, जाधववाडी, सराफवाडी, रेडा, यादववाडी परिसरातील शेकडो लाभधारक शेतकरी पाण्यासाठी पोरके राहिले.
या भागात मका, ऊस, ज्वारी, गहू, हरभरा अशी पिके पाण्यावाचून अखेरच्या घटका मोजत आहेत.
तरीही पाटबंधारे विभागाच्या अधिकारीवर्गाच्या लक्षात येत नाही. खासगी शेतकऱ्यांची शेततळी, विहिरी हे अधिकारी पैसे घेऊन भरतात. मात्र आमच्या हक्काचे पाणी का मिळत नाही? हे पाणी कोणाला विकले. कोणाची शेततळी भरली याचा जाब शेतकरी विचारणार आहोत.
वेळप्रसंगी न्यायालयात जाऊ, मात्र पाटबंधारे विभागाच्या कामचुकारपणा करणाऱ्यांविरोधात जनआंदोलन उभारू, असा इशारा सभापती वाघमोडे, खरेदी-विक्री संघाचे संचालक देवकर व किसन इनामे, मधुकर इनामे यांनी दिला आहे. (वार्ताहर)
>शेतकऱ्यांना वारंवार आवाहन करूनही ते पाणी अर्ज करीत नाहीत. आम्ही आता वरिष्ठांना विचारणा केली. तर तेही आम्हाला पाणी अर्ज आहे का असल्यास कळवा, असे म्हणत पाणी सोडण्यासाठी अपेक्षित मागणी नाही, असे सांगतात. जर आम्ही तरीही पाणी खाली सोडण्याचा प्रयत्न केल्यास कालव्याच्या वरील बाजूचे शेतकरी आक्रमक होतात. पाण्याचे फाटे फोडण्याचा इशारा देतात. रब्बीच्या सुरुवातीला पाणी अर्ज करा, असे प्रकटन आपण देत असतो. मात्र, त्याकडे शेतकरी दुर्लक्ष करतात.
- लक्ष्मणराव सुद्रिक, शाखाधिकारी