नीरा बाजारतळाच्या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्षच !

By Admin | Published: May 21, 2016 01:18 AM2016-05-21T01:18:04+5:302016-05-21T01:18:04+5:30

नीरा शहरातील बाजारतळ परिसरात प्रामुख्याने शेतकरीवर्गासाठी मूलभूत सुविधा अपुऱ्या पडत आहेत.

Neera market problem, neglected administration! | नीरा बाजारतळाच्या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्षच !

नीरा बाजारतळाच्या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्षच !

googlenewsNext


नीरा : सर्वाधिक उत्पन्नाची ग्रामपंचायत असलेल्या नीरा शहरातील बाजारतळ परिसरात प्रामुख्याने शेतकरीवर्गासाठी मूलभूत सुविधा अपुऱ्या पडत आहेत. आठवडेबाजारच्या दिवशी बाजारतळाच्या असलेल्या क्षेत्रापैकी बहुतांश क्षेत्राचा स्थानिक धनदांडगे आणि परगावातील व्यापाऱ्यांना बेसुमार वापर करू दिला जात आहे. शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी बाजारतळ परिसरातील लोकवस्तीमधील अंतर्गत रस्त्यांचा आधार घ्यावा लागतो. बाजारतळ परिसरात कोणत्याही प्रकारची स्वच्छतागृहाची आणि कचराकुंडीची ठोस मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने शेतकरी, व्यापारी नाराजी व्यक्त करत आहेत.
नीरा शहरात दर बुधवारी भरणाऱ्या आठवडेबाजारसाठी ग्रामपंचायतीच्या मालकीचे सुमारे २३ गुंठ्यांपेक्षा अधिक क्षेत्र असल्याचे सांगितले जाते. आठवडेबाजारच्या करवसुलीपोटी नीरा ग्रामपंचायतीला ठेकेदाराच्या माध्यमातून वार्षिक २५ लाख रुपयांपेक्षा अधिक निव्वळ उत्पन्न मिळत आहे. वास्तविक, गुरुवार वगळता अन्य दिवशी या परिसरात प्रामुख्याने दररोज पहाटेपासून शेतमालाची ठोक विक्री सकाळपर्यंत होत असते. नीरा परिसरातील शिवतक्रार, पिंपरे खुर्द, थोपटेवाडी, पिसुर्टी, वाल्हे, पाडेगाव, निंबूत, गुळुंचे, कर्नलवाडी अशा विविध गावांतील शेतकरी नीरा शहरातील बाजारतळ परिसरातल्या मंडईमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणतात. या शेतमालाच्या खरेदीसाठी प्रामुख्याने निंबूत, जेजुरी, सासवड, लोणंद, सातारा, महाड अशा विविध भागांतील दलाल-व्यापारी रात्रीपासूनच गर्दी करतात.
बाजारतळाकडे जाण्यासाठी काही अंतर्गत रस्ते असून त्यापैकी जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरच मच्छी मार्केट वसलेले आहे. या मच्छी मार्केटपासून ग्रामपंचायतीला एका दमडादेखील उत्पन्न मिळत नाही. शेतमालाची भाजी मंडई आणि आठवडेबाजार भरत असलेल्या बाजारतळाच्या अपुऱ्या जागेतच ८ लाखांपेक्षा अधिक निधी खर्च करून अद्ययावत मटण-मच्छी मार्केट बांधण्याचा ग्रामपंचायतीने घाट घातला असल्याची माहिती समजते. सध्या मुख्य रस्त्यावरच मच्छी बाजार भरत असल्याने विक्रेते आणि ग्राहकांच्या गर्दी व उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे या रस्त्यावर वाहतुकीची दररोज कोंडी होत असून, या भागातील नागरिकांना रहदारीची मोठी अडचण निर्माण होत आहे. (वार्ताहर)
बाजारतळ परिसरात आठवडेबाजाराच्या दिवशी शेतकरी आणि व्यापाऱ्यांना कठड्यांवर बसून शेतमालाची विक्री करता यावी, यासाठी पणन मंडळाच्या सहकायार्ने २५ लाख रुपये खर्चून गेल्या वर्षी कठड्यांचा जीर्णोद्धार करण्यात आला. अंतर्गत रस्त्यांवर नव्याने फेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आले, तर मध्यभागी भव्य मोठा पथदिवा बसवून प्रकाशाची चांगली सोय करण्यात आली. स्वच्छतागृह बांधण्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून संबंधित ठेकेदाराने अर्धवट स्थितीत सोडले आहे. संबंधित ठेकेदाराने स्वच्छतागृहाचे काम अपूर्ण अवस्थेत का ठेवले, याचा उलगडा मात्र होईना आणि ग्रामपंचायत प्रशासनदेखील त्याकडे लक्ष देईना. परिणामी, शेतकरी-व्यापारी या परिसरातील मुस्लिम समाजाच्या उर्दू शाळेच्या भिंतीलगतच्या जागेचा लघवीसाठी राजरोस वापर करीत आहेत.

Web Title: Neera market problem, neglected administration!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.