नीरा-नृसिंहपूरचा होणार कायापालट
By Admin | Published: March 4, 2016 12:42 AM2016-03-04T00:42:15+5:302016-03-04T00:42:15+5:30
विद्युतीकरण, पथदिवे व विद्युतजनित्र या कामांसाठी १४.१८ कोटी खर्च करणार आहे. दळणवळण व सोयी-सुविधांसाठी १0७.५३ कोटी, तर महसूल विभागाला भूसंपादनासाठी ९ कोटींचा निधी देण्यात
पुणे : १९९३ च्या भूकंपात तडे गेलेल्या व दुरवस्था झालेल्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील नीरा नृसिंहपूर परिसराचा कायापालट होणार आहे. तीर्थक्षेत्र देहू, आळंदी देवस्थान विकासाच्या धर्तीवर या परिसराचा विकास होणार असून, २६०.८६ कोटींच्या बृहत आराखड्याला बुधवारी शासनाच्या शिखर समितीने मान्यता दिली आहे. पुढील तीन वर्षांत या तीर्थक्षेत्राला उजाळा मिळणार आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश येथील भाविकांचे हे तीर्थक्षेत्र श्रद्धास्थान असून, महिन्याला येथे ३ ते ४ लाख भाविक येतात. तालुक्यातील या तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा मंजूर झाल्याने अनेक दिवसांची मागणी मार्गी लागली आहे. २०१५-१६ ते २०१७-१८ दरम्यान तीन टप्प्यात कामे मार्गी लावण्यात येणार आहे. त्यानंतर या परिसराचा पूर्णपणे कायापालट होणार आहे.
तीर्थक्षेत्राचा बृहत आराखडा व अंमलबजावणीचे टप्पे ठरविण्यात आले आहेत. पुरातत्त्व विभाग, जलसंपदा, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, विद्युत महामंडळ, महसूलसह इतर विभागांच्या माध्यमातून हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. या अंतर्गत मंदिर परिसराचे पूर्ण संवर्धन करण्यात येणार आहे. त्यानुसार घाट संवर्धन व अस्तित्वातील घाटास संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे.
बुडीत बंधारा बांधणे, जलक्रीडेसाठी धक्के, तराफे बांधणे, कोल्हापूर
पद्धतीच्या बंधाऱ्याची दुरुस्ती करणे, सुशोभीकरण करणे, सार्वजनिक सोयीसुविधांसह रस्त्यांचे रुंदीकरण, पथसुशोभीकरण, भक्त व पर्यटक
निवास बांधकाम आदी कामे करण्यात येणार आहेत. या सर्व आराखड्याचे संनियंत्रण पर्यटन विभागाकडे
राहणार आहे. (प्रतिनिधी)
पुरातत्त्व विभाग : मंदिर परिसराचे संवर्धन, घाट संवर्धन व अस्तित्वातील घाटास संरक्षण भिंत बांधण्याचे काम करणार असून, ३४.८२ कोटींचा यावर खर्च करणार आहे.
जलसंपदा विभाग : बुडीत बंधारे बांधणे, जलक्रीडा प्रकाराकरिता धक्के व तराफे बांधणे, अस्तितत्वातील कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरस्ती करणार असून, यासाठी ३0.३७ कोटी रुपये खर्च करणार आहे.
पर्यटन/सा.बां. विभाग : सार्वजनिक सोयी-सुविधांसाठी ११.२७ कोटी , अस्तित्वातील रस्त्यांचे रुंदीकरण व पथसुशोभीकरण १५.३३ कोटी, भक्त व पर्यटक निवासासाठी १७.९६ कोटी, तर माणकेश्वर वाडा संरक्षक भिंतीचे संवर्धन व बांधकामासाठी १.६८ कोटी असे ४६.१८ कोटींची कामे करणार आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण : पाणीपुरवठा व मलनिस्सारण व्यवस्थेसाठी १७.४६ कोटी, घनकचरा व्यवस्थापनासाठी १.७६ कोटी असे १९.२२ कोटींची कामे करणार आहे.
विद्युत महामंडळ : विद्युतीकरण, पथदिवे व विद्युतजनित्र या कामांसाठी १४.१८ कोटी खर्च करणार आहे.
दळणवळण व सोयी-सुविधांसाठी १0७.५३ कोटी, तर महसूल विभागाला भूसंपादनासाठी ९ कोटींचा निधी देण्यात येणार असून, इतर अनुषंगिक खर्चासाठी २.५0 कोटी ठेवण्यात येणार आहेत.
पुणे : शिवनेरी किल्ला, सिंहगड किल्ला, लोणावळा येथील पर्यटन विकासाचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असून, येत्या २ महिन्यात तो राज्यशासनाला सादर करण्यात येईल. भीमाशंकरचा प्रस्ताव तयार असून त्यावर रविवारी बैैठक घेतली जाणार असल्याचे, जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राव म्हणाले, शिवनेरी किल्ल्याच्या विकासाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यासाठी आर्किआॅलॉजिकल कन्सलटंट नेमण्यात आला आहे. त्यांचा अभ्यास पूर्ण झाल्यावर प्रस्तावात ते नमूद करून अंतिम प्रस्ताव तयार करण्यात येईल. भिमाशंकर तिर्थक्षेत्राच्या विकासाचे नियोजन करण्यासाठी कन्सलटंट नेमण्यात आला आहे. त्याचे काम सुरू आहे. येत्या ६ मार्चला त्यासंदर्भात बैठक घेऊन प्रस्ताव तयार करण्यात येईल आणि तो पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीला सादर करण्यात येणार आहे. लोणावळयाचा विकास साहसी क्रीडाप्रकारांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तर सिंहगड किल्ल्याच्या विकासाचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. तेथे पुणे महापालिका आणि पुरातत्व खात्याकडून अगोदरच काही कामे करण्यात येत आहेत. पण तेथे रोपवे उभारण्याचा, रस्ता रूंदीकरण, पाणीपुरवठा आदी प्रकल्प या प्रस्तावात प्रस्तावित करण्यात येणार आहे. भिमाशंकर तिर्थक्षेत्राच्या विकासासाठीचा प्रस्ताव १०० कोटी रूपयांचा तयार करण्यात आला आहे.
पुणे, सातारा सोलापूरला जोडणार
हे तीर्थक्षेत्र पुणे शहरापासून १२४, सोलापूरपासून ८२, तर सातारापासून १११ किलोमीटर अंतरावर असून, तेथून येथे येणाऱ्यासाठी रस्ते आहेत. मात्र, सद्य:स्थितीतील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, त्यांचा दर्जा व रुंदीकरणाचाही भविष्यात विचार असून, तसा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. तीर्थक्षेत्रस्थळावर १0 मीटर रुंदीचे १.५ किलोमीटर,६ मीटर रुंदीचे २.५ किलोमीटर रस्ते करण्यात येणार असून, भव्य असे प्रवेशद्वार करण्यात येणार आहे.