ऐन पावसाळ्यात नीरा नदी कोरडी
By admin | Published: August 3, 2016 01:00 AM2016-08-03T01:00:27+5:302016-08-03T01:00:27+5:30
आता सुकाळ यणार, या आशेवर असणाऱ्या नीरा नदीकाठच्या गावांना मात्र ऐन पावसाळ्यात दुष्काळाची तीव्रता जाणवू लागली आहे
वालचंदनगर : दुष्काळाची भयाण दाहकता दाखवणारे उन्हाळ्याचे दिवस सरले, पावसाळा सुरू झाला. आता सुकाळ यणार, या आशेवर असणाऱ्या नीरा नदीकाठच्या गावांना मात्र ऐन पावसाळ्यात दुष्काळाची तीव्रता जाणवू लागली आहे. अवैध वाळू व्यावसायिकांच्या लचकेतोडीमुळे आपले अस्तित्व जपत असलेल्या नीरा नदीचे दु:खाश्रू मात्र संपता संपेनात.
सर्वत्र मध्यम, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. इंदापूर तालुक्यात मात्र ढगाळ वातावरण असतानाही पावसाचे थेंबही टिपकत नसल्याने चार वर्षांपासून तालुका दुष्काळाच्या खाईत आहे. येथील शेतकऱ्यांना वरदान ठरलेली नीरा नदी कोरडी ठणठणीत आहे, तर नदीवरील सात कोल्हापूरी बंधारे श्वास रोखल्याने हजारो शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. नीरा नदीला पाणी सोडल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल; मात्र वाळू तस्करांनी नीरा नदीची चाळण केल्याने नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पुणे, सातारा व सोलापूर या जिल्ह्यांतील लाखो शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या नीरा नदीचे पात्रात आॅगस्ट महिना सुरू झालेला असला तरी थेंब पाणी नसल्याने कोरडे ठणठणीत आहे. या नीरा नदीवर तीन जिल्ह्यांतील लाखो शेतकऱ्यांच्या जमिनीचे भवितव्य अवलंबून आहे.
तालुक्यातील ओढेनाले चार वर्षांपासून कोरडे असल्याने शेतकऱ्यांच्या विहिरीच्या पाण्याच्या पातळीने फेब्रुवारी महिन्यातच तळ गाठला होता. (वार्ताहर)
>गावाला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या सार्वजनिक विहिरी कोरड्या पडल्याने पाणीपुरवठा सहा महिन्यांपासून थांबला आहे. दोन राजकारणी माणसांच्या हट्टाने शेटफळ हवेली येथील तळ्यात पाणी सोडले जात आहे.जनावरांचा व शेतीचा विचार करून पाठबंधारे विभागाने नीरा नदीच्या पात्रात पाणी सोडावे, अशी मागणी होत आहे.