नीट परीक्षा : विद्यार्थ्यांच्या कॉलर, बाह्या कापल्या, राज्यभर गोंधळात गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 04:07 AM2018-05-07T04:07:49+5:302018-05-07T04:07:49+5:30
नीट परीक्षेसाठी निश्चित करण्यात आलेल्या ड्रेस कोडचा फटका काही विद्यार्थ्यांना बसला. काही केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या शर्टची कॉलर, बाह्या कापण्यात आल्या. एका केंद्रावर विद्यार्थ्याचा शर्ट काढून बनियनवरच परीक्षा देण्यास सांगून अपमानित करण्यात आले.
पुणे : नीट परीक्षेसाठी निश्चित करण्यात आलेल्या ड्रेस कोडचा फटका काही विद्यार्थ्यांना बसला. काही केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या शर्टची कॉलर, बाह्या कापण्यात आल्या. एका केंद्रावर विद्यार्थ्याचा शर्ट काढून बनियनवरच परीक्षा देण्यास सांगून अपमानित करण्यात आले.
सोलापूर येथून पुण्यातील परीक्षा केंद्रावर येण्यास केवळ तीन मिनिटे उशीर झाला म्हणून एकाला परीक्षेला मुकावे लागले. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षेसाठी कडक नियमावली केली होती. ड्रेस कोडसह केंद्रात पेन, घड्याळ, पाण्याची बाटली तसेच इतर साहित्य केंद्रात घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली होती. वेळेच्या बाबतीतची काटेकोर सूचना देण्यात आल्या होत्या. पण अनेक विद्यार्थ्यांनी ड्रेस कोड तसेच वेळ पाळली नाही. परीक्षा सुरू होण्याची वेळ सकाळी १० असली तरी विद्यार्थ्यांना सकाळी ७.३० ते ८.३० आणि ८.३० ते ९.३० असे दोन गटात विभागण्यात आले होते. त्यांच्या प्रवेश पत्रावरही तसे नमुद केले आहे.
परीक्षा केंद्रावर पोहचण्यास केवळ तीन मिनिटे उशीर झाला तरी केंद्रात प्रवेश दिला नाही, असा दावा सोलापूर येथून पहिल्यांदाच पुण्यात आलेल्या माऊली कारंडे या विद्यार्थ्याने केला आहे. त्याच्यासह अन्य काही केंद्रांवरही विद्यार्थी ९.३० नंतर आल्याने त्यांना परीक्षेस बसण्यास मज्जाव करण्यात आला. ड्रेस कोडमध्ये कॉलर, फुल बाह्याचा शर्ट घालू नये, असे म्हटले होते. औंध येथील केंद्रावर विद्यार्थ्याचा बटन असलेला शर्ट काढून बनियनवरच परीक्षा देण्यास सांगण्यात आले. त्याचे बनियनवरील छायाचित्रही काढण्यात आले. त्यामुळे तो परीक्षेपूर्वीच निराश झाला होता. तेथील एकाने जवळील दुसरा टी-शर्ट त्याला दिला. या केंद्रावर फुल बाह्याचा शर्ट घालून आलेल्या एका विद्यार्थ्याच्या शर्टच्या बाह्या कापण्यात आल्याचे या केंद्रातील विद्यार्थ्याने सांगितले. पिंपळे सौदागर येथील परीक्षा केंद्रांवर आलेल्या काही विद्यार्थ्यांची कॉलर कापून त्यांना केंद्रात प्रवेश देण्यात आला. बहुतेक केंद्रांवर मंडळाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्यात आले.
पाण्याची अपुरी सुविधा
काही परीक्षा केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची चांगली सुविधा नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. बाणेर येथील केंद्रावर एकच पाण्याची बाटली आणि एकाच ग्लासाद्वारे वर्गात सर्वांना पाणी दिले जात होते.