NEET Paper Leak: आराेपी शिक्षकाची झाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीर्घ सेवा; संपर्कात आलेल्यांचीही चाैकशी होणार
By राजकुमार जोंधळे | Published: July 1, 2024 05:20 AM2024-07-01T05:20:15+5:302024-07-01T05:20:56+5:30
शिक्षक संजय जाधव याची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दीर्घ कारकिर्द लक्षात घेत काेकणात याचा काही संदर्भ लागताे का? याचीही चाैकशी केली जात आहे.
लातूर - जिल्ह्यातील बाेथीतांडा (ता. चाकूर) येथील संजय जाधव याचे नीट गुणवाढसंदर्भातील गुन्ह्यात नाव समाेर आल्यानंतर तपास यंत्रणांनी त्यांचा भूतकाळ तपासण्यास सुरुवात केली आहे. काेकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात जि.प. शिक्षक म्हणून त्याने २००३ ते २०२३ दरम्यान नाेकरी केली. या काळातील त्याची कारकिर्द कशी हाेती. त्याच्या संपर्कात काेण-काेण हाेते, याचाही शाेध आता घेतला जात आहे.
नीट गुणवाढीसंदर्भातील गुन्ह्याचा तपास स्थानिक यंत्रणा, एटीएस आणि सीबीआयकडून केला जात आहे. याची व्याप्ती राज्यातील किती जिल्ह्यात आहे. आराेपींच्या आमिषाला किती जण बळी पडले, त्यांच्या गळाला काेणकाेण लागले? याचाही शाेध घेतला जात आहे. शिक्षक संजय जाधव याची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दीर्घ कारकिर्द लक्षात घेत काेकणात याचा काही संदर्भ लागताे का? याचीही चाैकशी केली जात आहे.
२००३ साली ताे शिक्षक म्हणून रुजू...
संजय जाधव हा २० सप्टेंबर २००३ राेजी मांगेली देऊळवाडी (ता. दाेडामार्ग जि. सिंधुदुर्ग) येथे शिक्षण सेवक म्हणून रुजू झाला. त्यानंतर सावंतवाडी पंचायत समितीअंतर्गत जि.प.प्रा. शाळा मडुरे क्रमांक - ३ मध्ये त्याने दीर्घकाळ शिक्षक म्हणून काम केले. आंतरजिल्हा बदल्यात त्याची साेलापूर जिल्ह्यात बदली झाली. २ मे २०२३ राेजी सिंधुदुर्ग येथून त्याला कार्यमुक्त करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत असताना त्याची कारकीर्द कशी राहिली, याचाही शाेध घेतला जात आहे.