नेवाळीत शेतकऱ्यांचा एल्गार

By Admin | Published: January 12, 2017 07:10 AM2017-01-12T07:10:10+5:302017-01-12T07:10:10+5:30

स्वातंत्र्यपूर्व भारतात १९४२ सालच्या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी नेवाळी येथे ब्रिटिश सैन्याने एक हजार ६५० एकर जागा

Negative Farmers Elgar | नेवाळीत शेतकऱ्यांचा एल्गार

नेवाळीत शेतकऱ्यांचा एल्गार

googlenewsNext

कल्याण : स्वातंत्र्यपूर्व भारतात १९४२ सालच्या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी नेवाळी येथे ब्रिटिश सैन्याने एक हजार ६५० एकर जागा संपादित करून विमानतळ उभारले होते. मात्र, ही जागा केंद्र सरकारने अजूनही शेतकऱ्यांना परत केलेली नाही. या जागेवर आता नौसेनेने ताबा घेतला आहे. तेथे संरक्षक भिंत उभारली जाणार आहे. त्याविरोधात बुधवारी सकाळी हजारो ग्रामस्थ व बाधित शेतकरी रस्त्यावर उतरले. नेवाळीनाका परिसरात शेतकरी व ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन करीत नौसेनेने उभारलेल्या राहुट्या (तंबू) उलथवून लावले. नौसेनेने कारवाई करण्यापूर्वीच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केली. अन्यथा, हे आंदोलन चिघळण्याची दाट शक्यता होती. या वेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला. यामुळे तणाव निर्माण झाला होता.
१९४२ मध्ये ब्रिटिश सरकारने नेवाळी परिसरात संपादित केलेली एक हजार ६५० एकर जागा आजपासच्या १८ गावांतील शेतकऱ्यांची आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर भारत सरकारने ही जागा शेतकऱ्यांना परत करणे अपेक्षित होते. मात्र, सरकारने ही जागा संरक्षण खात्याकडे वर्ग केली. संरक्षण खात्याने ही जागा नौसेनेला दिली आहे. या जागेवर नौसेनेने संरक्षक भिंत उभारण्याचे काम हाती घेतले आहे. शेतकऱ्यांच्या जागा परत न करता तेथे संरक्षण भिंत उभारण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.
नेवाळी येथे विमानतळ होणार होते. मात्र, नियोजित विमानतळ नवी मुंबई येथे होत असल्याने आता नौसेनेला ही जागा कशासाठी हवी आहे, असा सवाल बाधित शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. या जागेचे सर्वेक्षण करण्यासाठी वर्षभरापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विनी जोशी तेथे गेल्या असता त्यांना ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी आंदोलन करून पिटाळून लावले होते. त्यामुळे वर्षभरापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांचा सर्वेक्षणाचा प्रयत्न फसला. आता पुन्हा नौसेनेने तेथे त्यांच्या राहुट्या उभारल्या.
नौैसेनेच्या हालचाली पाहता बुधवारी शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, तालुकाप्रमुख अशोक म्हात्रे, सर्वपक्षीय शेतकरी बचाव समितीचे मथूर म्हात्रे, चैनू जाधव, भाजपाचे राजेश पाटील, काँग्रेसचे अजय पाटील आणि शिवसेनेचे शुभम साळुंके यांनी तेथे धाव घेतली. नौसेनेच्या हालचालींना विरोध करण्यासाठी हजारोंच्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ जमले. आंदोलनकर्त्यांचे उग्र स्वरूप पाहता पालकमंत्री शिंदे यांनी तेथे धाव घेतली. पालकमंत्र्यांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला असता संतप्त आंदोलकांनी नौसेनेच्या राहुट्या उखडून फेकून दिल्या. या वेळी नौसेना, राज्य राखीव पोलीस दल आणि शहर पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला होता. इतका मोठा बंदोबस्त असतानाही नौसेनेचे जवान या परिसरात हेलिकॉप्टरने घिरट्या घालून आंदोलनाचा अंदाज घेत होते. आंदोलकांनी राहुट्या उखडून फेकण्यास सुरुवात केली, तेव्हा पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला. (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांच्या जागा परत करा : पालकमंत्र्यांची मध्यस्थी

पालकमंत्री शिंदे यांनी नौसेनेच्या काही अधिकाऱ्यांशी चर्चा केली. शेतकऱ्यांना जमिनी परत केल्याशिवाय कोणते काम हाती घेऊ नका. हा प्रश्न केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे याआधीच मांडलेला आहे. सरकारकडे कागदपत्रे मागितली आहेत. शेतकऱ्यांनी कायदा हाती घेऊ नये, असे आवाहन पालकमंत्र्यांनी या वेळी केले. संरक्षणमंत्र्यांकडे बैठक बोलवून तोडगा काढू, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.

Web Title: Negative Farmers Elgar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.