‘कीर्ती’विषयी नकारात्मक शिफारस ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2016 02:28 AM2016-03-18T02:28:11+5:302016-03-18T02:28:11+5:30
नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याबाबत तसेच जागा वाढविण्यासंदर्भात यावर्षी केंद्र सरकारकडे किती अनुकूल व प्रतिकूल शिफारशी करण्यात आल्या, याची सविस्तर माहिती
नागपूर : नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याबाबत तसेच जागा वाढविण्यासंदर्भात यावर्षी केंद्र सरकारकडे किती अनुकूल व प्रतिकूल शिफारशी करण्यात आल्या, याची सविस्तर माहिती तीन आठवड्यांत सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाला (एमसीआय) दिला.
या अहवालात खासगी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची आकडेवारी स्वतंत्रपणे देण्याची सूचनाही न्यायालयाने एमसीआयला केली आहे. न्यायमूर्ती भूषण गवई व न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांनी चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासंदर्भातील प्रकरणात हे आदेश दिलेत.
यावर्षी एमसीआयने या महाविद्यालयाविषयी नकारात्मक शिफारस केली आहे. एमसीआयच्या अधिकाऱ्यांनी महाविद्यालयाचे निरीक्षण करून त्रुटी काढल्या आहेत. या संदर्भात एमसीआयने न्यायालयात अहवाल सादर केला. न्यायालयाने निरीक्षण केल्यानंतर या महाविद्यालयातील त्रुटी कधीपर्यंत दूर करता, अशी विचारणा शासनास केली व प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रकाश इटनकर व रामदास वागदरकर यांनी ही याचिका दाखल केली आहे. गेल्यावर्षी उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे या महाविद्यालयाला परवानगी मिळाली होती. या आदेशाविरुद्ध एमसीआयने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळली होती. यावर्षी एमसीआयने पुन्हा या महाविद्यालयात विविध त्रुटी काढल्या आहेत.