नेत्यांच्या नावांच्या पाट्या पुसून नवं घडत नाही, नवा इतिहास आपणच घडवायला हवा - उद्धव ठाकरे
By admin | Published: May 28, 2016 08:52 AM2016-05-28T08:52:44+5:302016-05-28T09:45:56+5:30
नेहरू, इंदिराजी, राजीव गांधी, नरसिंह रावांच्या नावाच्या फक्त पाट्या पुसून नवे घडणार नाही. आपला नवा इतिहास आपणच घडवायला हवा असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - देशातील महत्वपूर्ण योजना, ठिकाणे वा रस्ते यांना देण्यात आलेली तत्कालिन सरकारमधील राजकीय नेत्यांची नावे बदलून नवी नावे देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर वाद सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उदधव ठाकरे यांनी टिप्पणी केली आहे. ' नेहरू, इंदिराजी, राजीव गांधी, नरसिंह रावांच्या नावाच्या फक्त पाट्या पुसून नवे घडणार नाही. आपला नवा इतिहास आपणच घडवायला हवा' असा टोला ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना लगावला आहे. 'आधीच्या सरकारने काहीच केले नाही हा मंत्र नसून तुणतुणे असते. आधीच्या सरकारांनी काहीच केले नसते तर आजचा देश दिसलाच नसता' असेही त्यांनी म्हटले असून ' कर्ज काढून सण साजरा करण्याची परंपरा येथे आहेच. हे कर्ज कमी झाले तरी देश पुढे जाईल' असा सल्लाही उद्धव यांनी दिला आहे.
काय म्हटले आहे अग्रलेखात :
- सर्व समस्यांवर विकास हाच उपाय असल्याचा मंत्र पंतप्रधान मोदी यांनी जपला आहे. गेल्या ६० वर्षांत या मंत्राची जपमाळ अनेकांनी ओढली आहे आणि देशाची प्रगती तसेच विकास आपल्यामुळेच झाला असे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. देवेगौडा हे अल्पकाळासाठी अपघाताने पंतप्रधान झाले, पण त्यांनीही हीच जपमाळ ओढली व देशाचा जो काही विकास झाला तो आपल्या सात-आठ महिन्यांच्या कारकीर्दीत झाल्याचा दावा ते पायउतार होईपर्यंत करीत राहिले. मोदी यांची स्थिती तशी नाही. मोदी यांच्यात दम आहे व करून दाखविण्याची इच्छा आहे. त्यांच्या कारकीर्दीस दोन वर्षे झाल्याने सरकार उत्सव साजरा करण्याच्या मूडमध्ये आहे. एक तर मोदी यांच्या सरकारकडे संसदेत संपूर्ण बहुमत आहे व भारतीय जनता पक्षात ‘हायकमांड’ मोडीत निघाल्याने मोदी सांगतील तीच पूर्व अशी परिस्थिती आहे. त्यामुळे देशात परिवर्तन घडविण्यासाठी मोदी त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेऊ शकतात.
- सरकारला दोन वर्षे झाल्यानिमित्त मोदी यांनी जे भाषण केले आहे त्यावर डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांच्यासारख्या जाणकार अर्थतज्ज्ञांनीच मत व्यक्त केले पाहिजे. मोदी यांनी त्यांच्या ताज्या भाषणात अशी आश्वासने दिली आहेत की, पुढील तीन वर्षांत पाच कोटींहून अधिक जणांना एलपीजी जोडण्या देऊ. राज्ये अधिक सक्षम करू. गरीबांना सावकारी पाशातून मुक्त करू. डॉक्टरांची संख्या कमी असल्याने सरकारी खात्यांतील डॉक्टरांच्या निवृत्तीचे वय ६५ करण्याची घोषणा मोदी यांनी केली आहे. डॉक्टरांनी गरिबांची सेवा करावी असा सल्लाही मोदी यांनी दिला आहे. पण सेवा करावी म्हणजे नक्की काय करावे? देशातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे साफ धिंडवडे निघाले आहेत. इतर राज्यांचे सध्या बाजूला ठेवूया. पण प्रत्यक्ष गुजरात राज्यातल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर ‘कॅग’ने ताशेरे ओढले आहेत. जिल्हा रुग्णालयांच्या इमारती व त्यातील व्यवस्था भयंकर असल्याचे म्हटले आहे. गुजरातप्रमाणेच इतर अनेक राज्यांतही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या निवृत्तीचे वय वाढवून काय होणार?
- देशातील सार्वजनिक वितरण प्रणाली व आरोग्य व्यवस्थेचे नव्याने ऑडिट करणे गरजेचे आहे. पंतप्रधानांची इच्छा प्रबळ असली तरी या सार्वजनिक सेवा देणार्या व्यवस्थेचे सर्व खांब ठिसूळ झाले आहेत. राज्ये अधिक सक्षम करण्यावर मोदी यांनी भर दिला व आम्ही त्यांच्या भूमिकेचे स्वागत करतो. पण ज्या राज्यात भाजपचा पराभव झाला किंवा जेथे विरोधकांचे राज्य आहे अशी राज्ये केंद्र सरकारच्या सक्षम योजनेत सामील आहेत काय? केंद्र सरकार सावत्रपणाच्या भूमिकेतून वागले असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ताडताड बोलत असतात. बिहार निवडणुकीपूर्वी त्या राज्यास ७० हजार कोटी रुपये देण्याची घोषणा पंतप्रधानांनी जाहीर सभेत केली होती. आंध्र राज्यासही जी आश्वासने दिली होती त्यांची पूर्तता झाली नसल्याची बोंब चंद्राबाबू नायडू यांनी मारली आहे.
- महाराष्ट्राच्या दुष्काळ निवारणासाठीही पुरेसा निधी मिळाला नाही. मुख्यमंत्री फडणवीस हे संकोची वृत्तीचे असल्यामुळे बोलणार नाहीत, पण पुरेसा निधी मिळू शकला नाही व राज्यातील बर्याच दुष्काळी भागांची होरपळ सुरू आहे हे वास्तव नाकारता येणार नाही. सरकारने केवळ ३०० दिवसांत सात हजार खेड्यांत वीज पोहोचविल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. देश बदलत आहे, देश वेगाने पुढे जात आहे असेही मोदी सांगताना दिसत आहेत व त्याबद्दल सगळ्यांनाच आनंद आहे. मोदी यांनी कामाचा धडाका लावला आहे व त्याचा उत्सव सुरू आहे. पण कश्मीर खोर्यात हिंदू पंडितांना पाय ठेवू देणार नसल्याची बांग तेथील फुटीरतावाद्यांनी पुन्हा दिली आहे. सात हजार खेड्यांत वीज पोहोचूनही कश्मिरी पंडितांच्या आयुष्यातला अंधार दूर होऊ शकलेला नाही. पंतप्रधानांचा शब्द हा राष्ट्रप्रमुखाचा शब्द असतो. त्यामुळे जनता मोठ्या अपेक्षेने पाहत असते. दोन वर्षांच्या वाटचालीनंतर मोदी यांनी पुन्हा नवे शब्द दिले आहेत. आधीच्या सरकारने काहीच केले नाही हा मंत्र नसून तुणतुणे असते. आधीच्या सरकारांनी काहीच केले नसते तर आजचा देश दिसलाच नसता. आपला नवा इतिहास आपणच घडवायला हवा. म्हणजे तो सुवर्णाक्षरात लिहिला जाईल.