निष्काळजीपणाने गाठला कळस
By admin | Published: October 16, 2016 08:57 PM2016-10-16T20:57:57+5:302016-10-16T20:57:57+5:30
पश्चिम विदर्भाचे ट्रॉमा केअर सेंटर म्हणून ओळख असलेल्या अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणाने रविवारी कळसच गाठला
Next
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 16 : पश्चिम विदर्भाचे ट्रॉमा केअर सेंटर म्हणून ओळख असलेल्या अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणाने रविवारी कळसच गाठला. रुग्णालयातील वार्ड क्र. ६ मध्ये तापावर उपचार करण्यासाठी भरती असलेल्या तरुणास त्याच्या शेजारच्या खाटेवरील विष प्राशन केलेल्या रुग्णाचे इंजेक्शन व सलाईन देण्याचा प्रकार येथे रविवारी सकाळी घडला. यामुळे तापाने आजारी असलेल्या तरुणाची तब्येत बिघडल्याची तक्रार तरुणाच्या आईने केल्यानंतर त्याच्यावर योग्य उपचार करण्यात आले. दरम्यान, सायंकाळी दोन्ही रुग्णांची तब्येत स्थिर असल्याचा दावा सर्वोपचारच्या डॉक्टरांनी केला.
स्थानिक इराणी झोपडपट्टी भागातील सय्यद जमीर सय्यद वजीर (२२) या तापाने फणफणलेल्या तरुणाची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्याला शनिवारी रात्री २ वाजता सर्वोपचार रुग्णालयातील वार्ड क्र. ६ मध्ये दाखल करण्यात आले. रात्रपाळीतील डॉक्टरांनी त्याच्यावर योग्य उपचार केल्यानंतर रविवारी सकाळपर्यंत त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यानंतर सकाळी ७ वाजताच्यादरम्यान कर्तव्यावर असलेल्या आरोग्य कर्मचाºयांनी त्याला इंजेक्शन व सलाईन दिले. त्यानंतर काही वेळातच सय्यद जमीर सय्यद वजीर याला अचानक ताप चढला व त्याला झटके येण्यास सुरुवात झाली. नातेवाइकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत वॉर्डमध्ये कार्यरत परिचारिका व आरोग्य कर्मचाºयांना सांगितले. त्यांनी मात्र या प्रकाराकडे लक्ष देण्याऐवजी कानाडोळा केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाइकांनी हा प्रकार एका सामाजिक कार्यकर्त्यास सांगितला. सदर सामाजिक कार्यकर्त्याने सर्वोपचारमध्ये येऊन डॉक्टरांना या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर आरोग्य कर्मचाºयांनी सय्यद जमीर सय्यद वजीरची तपासणी केली असता, त्याला नजरचुकीने त्याच्या शेजारच्या खाटेवर भरती असलेल्या विष प्राशन केलेल्या रुग्णाचे इंजेक्शन दिल्या गेल्याची चूक डॉक्टरांच्या लक्षात आली. (प्रतिनिधी)
असा झाला घोळ-
वॉर्ड क्र. ६ मध्ये सय्यद जमीर सय्यद वजीर याच्या शेजारच्या खाटेवर तेल्हारा तालुक्यातील जाफ्रापूर येथील ज्ञानदेव काशीराम बोदडे (५०) यांच्यावर शुक्रवारपासून उपचार सुरू आहेत. दोघांची औषधे जवळजवळ ठेवण्यात आल्याने बोदडे यांचे इंजेक्शन व सलाईन सय्यद जमीर सय्यद वजीरला देण्यात आले. त्यामुळे आपल्या मुलाची प्रकृती बिघडल्याचा आरोप त्याची आई शाहीदाबी यांनी केला आहे.
या प्रकाराची चौकशी केली जाणार आहे. उपचारात निष्काळजीपणा दाखविणाºया कर्मचाºयांवर योग्य कारवाई केली जाईल.
- डॉ. अनंत डवंगे, चिकित्सा अधीक्षक, सर्वोपचार रुग्णालय, अकोला.