न व्या ज ल स्रो तां चे पालिकेला वावडे
By Admin | Published: June 30, 2014 11:41 PM2014-06-30T23:41:46+5:302014-06-30T23:41:46+5:30
बेभरवशी पावसामुळे पुणोकरांवर पाणीटंचाईचे संकट कोसळले आहे. आठवडाभर पाऊसच पडला नाही, तर मात्र पाण्याची गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
>पुणो : बेभरवशी पावसामुळे पुणोकरांवर पाणीटंचाईचे संकट कोसळले आहे. आठवडाभर पाऊसच पडला नाही, तर मात्र पाण्याची गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पुणो शहर सर्व दिशांनी विस्तारतेय, वाढतेय; पण त्या प्रमाणामध्ये पाण्याचे स्रोत मात्र शोधण्याचे प्रमाण कमी आहे, किंबहुना होतच नाही. महापालिकेच्या हद्दीत जलस्रोतांचा शोध घेऊन त्यांना नीटनेटके केल्यास पाणीसंकट ओढवणार नाही. जलस्रोतांबाबतची उदासीनता पालिकेने झटकायला हवी. उपलब्ध जलस्रोतांमधील पाण्याचा पुनर्वापर करण्याच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना झाल्यास पाण्याची समृद्धता नांदेल यात शंका नाही.
दोन दशकांपूर्वी पेन्शनरांचे शहर म्हणून ओळखले जाणारे पुणो शहर वाढत्या नागरीकरणामुळे देशातील प्रमुख आठ महानगरांमधील एक शहर म्हणून नावारूपास आले आहे. मात्र, शहराच्या या वाढीबरोबर शहराची लोकसंख्या दुपटीने वाढली असली, तरी पाण्यासाठीचे स्रोत वाढविणो महापालिकेस शक्य झालेले नाही. त्यामुळे या दोन दशकांत दरवर्षी नागरिकांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पालिकेने हजारो कोटींचा खर्च केला असला तरी, नव्या जलस्रोतांचे पालिकेस वावडेच असल्याचे दिसून येते. शहराच्या परिसरात असलेले तलाव, पेशवेकालीन उच्छवास, पालिकेच्या तसेच खासगी बोअरवेल्स याशिवाय सार्वजनिक पाणवठय़ांच्या विहिरींचा त्यात समावेश आहे. हे स्रोत गेली अनेक वर्षे दुर्लक्षित राहिले आहेत. त्यांचा वापर सुनियोजित पद्धतीने केल्यास पालिकेस दरवर्षी सुमारे तीन ते चार टीएमसी पाणी सहज उपलब्ध होणार आहे.
1953 मध्ये स्थापन झालेल्या महापालिकेची पहिली वाढ 1981 मध्ये झाली. आधी केवळ पेठांपुरते विस्तारित असलेल्या या शहरात 1981 मध्ये सुतारवाडी हे गाव समाविष्ट करून घेण्यात आले. त्यानंतर 1983 मध्ये घोरपडी या गावाचा समावेश करण्यात आला. त्यानंतर पुढे 1997 मध्ये नव्याने 38 गावांचा समावेश पालिकेत करून घेण्यात आला. त्यामुळे 1983 मध्ये अवघे 19 वर्ग किलोमीटर असलेल्या शहराचा विस्तार 200 वर्ग किलोमीटरने वाढला. मात्र, त्यानंतर पुन्हा 15 गावे अंशत: वगळण्यात आली. मात्र, त्यानंतर वर्ष 2000 पासून शहराची वाढ झपाटय़ाने झाली. 2001 च्या जनगणनेत ही गावे समाविष्ट झाल्यानंतर पालिकेची लोकसंख्या सुमारे 25 लाखांच्या घरात पोहोचली आणि त्यानंतरच पाणी समस्येला सुरुवात झाली.
या गावांच्या समावेशानंतर पालिकेस सुमारे 7.50 टीएमसी पाण्याची गरज भासत होती. त्यानुसार, पालिकेस खडकवासला प्रणालीतील धरणसाठय़ामध्ये असलेले पाणी पुरेसे होते. त्यानंतर पुन्हा 2004 मध्ये जादा पाण्याची गरज निर्माण झाल्याने पालिकेने सुमारे 11.50 टीएमसी पाण्याचा करार पाटबंधारे विभागाशी केला. त्यानंतर 2011 मध्ये शहराची लोकसंख्या 31 लाख 35 हजारांच्या घरात पोहोचली, तर तरल लोकसंख्या 5 लाखांच्या घरात पोहोचली आहे. मात्र, पालिकेच्या अंदाजानुसार, 2013 मध्ये लोकसंख्येने 40 लाखांचा आकडा गाठलेला आहे. त्यासाठी सुमारे 16 टीएमसी पाण्याची गरज आहे. तर शासनाने नव्याने 34 गावे घेण्याचा निर्णय घेतला असल्याने आता पालिकेस शहरासाठी 20.50 टीएमसी पाण्याची गरज आहे. त्यामुळे ही शहराची वाढ आणि लोकसंख्या पाहता धरणांचा साठा मात्र कायमच आहे. त्यामुळे पाणीकपातीचे संकट दरवर्षीच आ वासून उभे असून, नव्या स्रोतांची गरज भासत आहे.
जलस्रोतांच्या वापराऐवजी त्याचे केले नुकसान
शहराच्या चारही दिशांना पाण्याचे मोठे जलस्रोत असलेले सुमारे 5 तलाव आहेत. या तलावांच्या पाण्याचा वापर शहरासाठी करणो महापालिकेस शक्य असतानाही, गेली अनेक वर्षे या पाण्याचा वापर पालिकेस करता आलेला नाही. याउलट या पाण्यामध्ये सांडपाणी सोडून त्या तलावांचे अस्तित्वच धोक्यात आणण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून झाला नाही. या तलावामधील गाळ काढून त्या ठिकाणी पाणीसाठा निर्माण केल्यास पालिकेस शहरासाठी दरवर्षी सुमारे एक ते दीड टीएमसी पाणी उपलब्ध करून घेणो शक्य आहे. हे पाणी पालिकेची उद्याने, तसेच पालिकेच्या विकासकामांसाठी वापरणोही शक्य आहे.
महापालिकेने काय करावे?
1कात्रजच्या दोन्ही तळ्यांमधील गाळ काढणो आवश्यक आहे. त्यामुळे तळ्यातील झ:यांची तोंडे मोकळी होतील. दगडी नळ आणि उच्छवासांची दुरुस्ती करणो आवश्यक आहे.
2 प्रत्येक उच्छवासावर झाकणो लावून कुलूपबंद करणो गरजेचे आहे. त्यामुळे उच्छवासाचे क्रमांक संकलित होऊन भुयारी मार्गाचा आजअखेरचा अंतिम नकाशा तयार करता येईल.
3बांधकाम परवानग्या आणि ड्रेनेज लाईन जोडताना विशेष खबरदारी घ्यायला हवी. याकरिता बांधकाम खाते आणि पाणीपुरवठा विभागाने जागरूक राहायला हवे.
4ज्या ठिकाणी भूमिगत पाणीपुरवठा यंत्रणोतील भुयारी मार्गाना ड्रेनेज अगर मैलापाणी नलिका जोडल्या असतील, अशा ठिकाणांचा शोध घ्यायला हव्या. तसेच अशा ड्रेनेजनलिका काढून टाकाव्या.
5पाण्याचा पुनर्वापर करण्याच्या दृष्टीने तज्ज्ञ आणि अभ्यासकांची समिती नेमावी. पाण्याचा उपसा, कालावधी आणि सध्याची परिस्थिती याचा अभ्यास करून प्रकल्पाची पुढील दिशा ठरवावी.