ना आंब्याचं, ना लिंबाचं, चटकदार लोणचं हे बांबूचं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 09:18 AM2024-02-16T09:18:22+5:302024-02-16T09:18:47+5:30
या लोणच्याचे अनेक औषधी गुणधर्म असल्याने ते शरीरासाठी देखील उत्तम
गोकुळ पवार
आतापर्यंत आपण लोणच्याचे विविध प्रकार पाहिले असतील. मात्र रानात, शेतात उगवणाऱ्या बांबूपासून देखील उत्कृष्ट असे लोणचे बनविले जाते आणि ते चवीने खाल्लेही जाते. या लोणच्याचे अनेक औषधी गुणधर्म असल्याने ते शरीरासाठी देखील उत्तम असल्याचे बांबू लोणचे उत्पादक आदिवासी शेतकरी महिला उद्योजकांनी सांगितले.
लोणचं कसं करतात?
लोणचं तयार करण्यासाठी बांबूच्या वरील मऊ भागाचा वापर केला जातो, जो की सुरुवातीला कोवळ्या स्वरूपात असतो. या कोवळ्या भागाचे लहान-लहान तुकडे आणि मीठ एका भांड्यात झाकून ठेवले जाते.
काही तासांनंतर बांबूचे निघालेले पाणी भांड्यातून काढून टाकतात. त्यानंतर बांबूचे तुकडे वाळवले जातात. या वाळलेल्या बांबूच्या छोट्या छोट्या तुकड्यांना मसाला लावून लोणचं तयार केलं जातं.
नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील अनेक शेतकरी महिला बांबूचे लोणचे तयार करून ते बचतगटाच्या माध्यमातून विक्रीसाठी आणत आहेत. त्यातून त्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
अशी सुचली कल्पना
nपेठ तालुक्यातून आलेल्या भाग्यलक्ष्मी बचत गटाच्या रेखा जाधव म्हणाल्या की, आम्ही या कोवळ्या बांबूची भाजी करत असू. आमच्याकडे लोणचे म्हटलं तर आंब्याचे केले जाते. मात्र बांबूपासून लोणचं बनवून पाहायचं ठरलं आणि आम्ही यात यशस्वी देखील झालो.
nत्यानंतर हळूहळू नातेवाईक, मित्रमंडळी यांना हे बांबूचं लोणचं चवीसाठी दिले. त्यांच्याकडून चांगली प्रतिक्रिया आल्यानंतर आम्ही हे लोणचं बाजारात आणलं.
nहे लोणचं वर्षभर टिकतं. आज ग्रामीण भागासह शहरी भागातील नागरिकांचा देखील चांगला प्रतिसाद असल्याचे जाधव यांनी सांगितले.
शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारी, त्यांच्या मदतीसाठी तत्पर असणारी आणि बळीराजाला ‘राजा’ मानणारी त्यांच्या हक्काची वेबसाईट www.lokmatagro.com
नक्की भेट द्या!