"ना खेळाडूंचा गौरव, ना पुरस्काराची रक्कम, हा तर त्यांचा अपमान"; Ajit Pawar यांनी सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 03:08 PM2023-03-21T15:08:37+5:302023-03-21T15:09:58+5:30
सहा महिने होऊन गेले, सरकारच्या नुसत्याच घोषणा; शिंदे-फडणवीस सरकारला अजित पवारांनी धारेवर धरलं
Ajit Pawar, Maharashtra Budget सहा महिने होऊन गेले पण सरकारच्या नुसत्याच घोषणा सुरू आहेत. अद्याप खेळाडूंचा गौरवही केलेला नाही आणि त्यांना पुरस्काराची रक्कमसुध्दा मिळालेली नाही. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्षवेधी कामगिरी केलेल्या खेळाडूंना अशी वागणूक देणे म्हणजे महाराष्ट्रातल्या खेळाडूंचा सरकारकडून केला जाणार अपमान आणि अवहेलना आहे, असा घणाघात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. या विजेत्या खेळाडूंना घोषित केलेली रक्कम तसेच त्यांचा उचित गौरव करण्याची मागणीही अजित पवार यांनी सभागृहात केली.
"महाराष्ट्रातल्या खेळाडूंनी गेल्यावर्षी विविध खेळात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्षवेधी कामगिरी केली आहे. या खेळाडूंना रोख रकमेची घोषणा राज्य सरकारच्यावतीने करण्यात आली होती. मात्र या घोषणेला सहा महिने उलटून गेले तरी विजेत्या खेळाडूंना ना घोषीत करण्यात आलेली रक्कम मिळाली, ना त्यांचा गौरव करण्यात आला. राज्यसरकार राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयस्तरावर महाराष्ट्राची मान उंचावणाऱ्या खेळाडूंची अवहेलना करत आहे," असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.
"महाराष्ट्रातल्या खेळाडूंनी गेल्या वर्षी राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध खेळात चमकदार कामगिरी केली आहे. गेल्या वर्षभरात विविध खेळाडूंनी २८६ पदकांची लयलूट केली आहे. तसेच यावर्षीच्या खेलो इंडिया स्पर्धेत सुध्दा महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत देशात सर्वाधिक पदके पटकावली आहेत. गेल्या वर्षभरात राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय स्तरावर चकमदार कामगिरी केलेल्या खेळाडूंना रोख रक्कम देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती," याची आठवणही अजित पवार यांनी करुन दिली.