ना कुठले थिएटर ना भव्यदिव्य रंगमंच ; तरी ' गुरूस्कूल ' चं नाटक रंगतेय घराघरांत...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 03:30 PM2019-03-16T15:30:56+5:302019-03-16T15:49:04+5:30
प्रायोगिक, हौशी, नवोदित कलाकारांचा पहिला प्रयोग होताना मारामार होते. तिथे ना कोणता रंगमंच, ना भव्यदिव्य सेट, ना मेकअप ना वेशभूषा...अशा माध्यमातून ' त्यांनी ' नाटक पोहोचवले घराघरात नाटक...
- नम्रता फडणीस -
एकवीस वर्षांपूर्वी त्यांनी सुरू केलेली ही संकल्पना राज्यातील नाट्य कला जोपासू पाहाणारी मंडळी उचलून धरू लागली आहेत, हेच या संकल्पनेचे यश म्हणावे लागेल.....
पुणे : एखादी मोठी स्क्रीन लावून किंवा होम थिएटरच्या माध्यमातून प्रत्यक्षात थिएटरमध्ये चित्रपट पाहात असल्याचा फील आज आपण घरबसल्या घेऊ शकतो...पण नाटकाचा सुद्धा जिवंत अनुभव घरबसल्या आपल्याला सहजपणे मिळू शकतो. नाटकांकडे प्रेक्षक फिरकत नाहीत अशी केवळ टीका करण्यापेक्षा थेट कृतीतून सकारात्मक पाऊल उचलणे गरजेचे आहे, या जाणीवेतून काही रंगकर्मी नाटकच प्रेक्षकांच्या दारी घेऊन जाण्याचा प्रयोग करीत आहेत, त्यातील एक नाव म्हणजे प्रा. देवदत्त पाठक यांचे. नाटक कंपन्यांना निर्मितीचा न परवडणारा खर्च किंवा नाटकाच्या तिकिटांचे अवाजवी दर आणि या चढ्या दरांपायी प्रेक्षकांची नाटकांकडे फिरवली जाणारी पाठ या गोष्टीमुळे नाट्य निर्मितीचे न जुळणारे अर्थकारण हा कळीचा मुद्दा ठरत आहे.काही मोजकी नाटके सोडली तर उर्वरित नाटकांना प्रेक्षकवर्ग मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. पण यासाठी काहीतरी वेगळे प्रयोग करणे आवश्यक आहे. याच उद्देशाने एकवीस वर्षांपूर्वी ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. देवदत्त पाठक यांनी गुरूस्कूल संस्थेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन नाटक करण्याचा प्रयोग केला होता. या संकल्पनेला आता रसिकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे.
काही दिवसांपूर्वीच सोलापूरमध्ये एकाच दिवशी ६ प्रयोग करून संस्थेने विक्रम केला आहे. त्याविषयी प्रा. देवदत्त पाठक म्हणाले, सोलापूरमध्ये इंगळे कुटुंबासह, हुतात्मा स्मृतीमंदिरामध्ये अ.भा.मराठी नाट्य परिषदेच्या बालनाट्य महोत्सवात २ प्रयोग, जक्कल कुटुंबाच्या घरी २ प्रयोग, शेट्टी कुटुंबात २ प्रयोग असे मिळून सहा प्रयोग आम्ही केले. त्यामध्ये बे दुणे बकरी, सर्कस, देवा रे देवा अशा नाटकांचा समावेश होता. गेल्या तीन महिन्यांत घराघरांमध्ये तब्बल ६२ प्रयोग झाले आहेत.
आज थिएटर मिळण्यापासून प्रेक्षक नाटकांपर्यंत पोहोचणे हे खूप महत्त्वाचे आहेत. एकंदरच नाट्यकलेकडे बघण्याचा दृष्टीकोन असा आहे की लोक घरातच नाटक पाहाण्याचा आनंद घेतात. त्यामुळे नाट्यकला रूजली पाहिजे यासाठी आपणच प्रयत्न करायले हवेत असे वाटले आणि संशोधनातून ही संकल्पना राबविली असल्याचे त्यांनी सांगितले.
............
नाटक घरात ही संकल्पना सर्वांना नवीन वाटली. तुम्ही जे घरोघरी करत आहात ते आम्ही सोलापूरात रूजवायचा प्रयत्न करू, असे सांगून या संकल्पनेची माहिती त्यांनी जाणून घेतली. मिरजेमधूनही दूरध्वनी आला, आमच्याकडे थिएटर नाहीत त्यामुळे आम्ही या माध्यमातून नाटक करू इच्छितो. आता १ एप्रिलला या संकल्पनेवर आधारित नाटकाचा पहिला प्रयोग मिरजमध्ये होत आहे. नाट्यकला जोपासणाºया या मंडळींनी ही संकल्पना उचलून धरल्याचा आनंद आहे.
- प्रा. देवदत्त पाठक, संस्थापक गुरूस्कूल