मंदिरात महिला पुजारी नसणे हे दुर्दैैवी - तृप्ती देसाई
By Admin | Published: March 13, 2016 01:47 AM2016-03-13T01:47:00+5:302016-03-13T01:47:00+5:30
महिलांमध्ये लढाऊ वृत्ती ही तयार होत नसते, तर ती प्रत्येकात असते. ती फक्त पुढे आणावी लागते. आंदोलने ही हक्कांसाठी असतात. आम्ही आंदोलने करतो ते कोणत्याही देवाविरोधी किंवा धर्माविरोधी नाही
पुणे : महिलांमध्ये लढाऊ वृत्ती ही तयार होत नसते, तर ती प्रत्येकात असते. ती फक्त पुढे आणावी लागते. आंदोलने ही हक्कांसाठी असतात. आम्ही आंदोलने करतो ते कोणत्याही देवाविरोधी किंवा धर्माविरोधी नाही, तर ती समानतेच्या हक्कांसाठी असतात. देवीच्या मंदिरात महिला पुजारी नसणे ही दुर्दैवाची गोष्ट आहे, अशी खंत भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका तृप्ती देसाई यांनी व्यक्त केली.
सावित्रीबाई फुले स्मृतिदिन आणि जागतिक महिला दिनानिमित्त लायन्स क्लब्ज इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३ डी २ तर्फे विविध क्षेत्रांत कर्तृत्व गाजविणाऱ्या ११ महिलांना स्वयंसिद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्या वेळी त्या बोलत होत्या.
ज्येष्ठ पत्रकार आरती कदम, लायन्स क्लब ३२३ डी २ चे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर श्रीकांत सोनी, चंद्रहास शेट्टी, राजेंद्र गोयल, क्लबच्या शैलजा सांगळे, नीता शहा, जयश्री पेंडसे, सुनीता शिर्के उपस्थित होते.
संध्या देवरुखकर यांनी सूत्रसंचालन केले. जयश्री पेंडसे यांनी प्रास्ताविक केले. सुनीता शिर्के यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
सोनल दरवडे, जाई खामकर, अंबू गोविंदगिरी, प्रतिभा डेंगळे, शोभना मंत्रिवादी, उषा राऊत, अनुराधा जाधव, ज्योती पुंडे, सुखदा साने, हर्षा शहा, डॉ. राजश्री महाजनी यांचा सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
तृप्ती देसाई म्हणाल्या, ‘‘अनेक महिला आजही त्यांच्या हक्क आणि अधिकारांपासून अनभिज्ञ आहेत. महिलांना एकविसाव्या शतकात समानतेसाठी रस्त्यावर उतरावे लागत, आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आमचे हक्क आम्हाला मिळाले तर कोणत्याही आंदोलनाची गरज पडणार नाही.’’
श्रीकांत सोनी म्हणाले, ‘‘भारतात आजही पुरुषप्रधान संस्कृती अस्तित्वात आहे. तरीही आज अनेक क्षेत्रे अशी आहेत, जिथे महिलाच सरस आहेत.’’
आरती कदम म्हणाल्या, ‘‘पत्रकार हा समाजामध्ये माध्यम म्हणून काम करीत असतो. समाजात सकारात्मक बाबी दाखवून तो आशा जागृत ठेवतो.’’