नेपाळमध्ये भीषण अपघात झालेल्या बसमधील भाविक महाराष्ट्रातील, आतापर्यंत १४ मृतदेह सापडले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 03:21 PM2024-08-23T15:21:51+5:302024-08-23T15:31:07+5:30
Nepal Bus Accident: नेपाळमध्ये भाविकांना घेऊन जात असलेल्या बसला भीषण अपघात झाला असून, आतापर्यंत १४ जणांचे मृतदेह सापडले आहेत. दरम्यान, या अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर आली असून, बसमधून प्रवास करत असलेले भाविक हे महाराष्ट्रातील (Maharashtra) असल्याचं वृत्त समोर आलं आहे.
नेपाळमध्ये भाविकांना घेऊन जात असलेल्या बसला भीषण अपघात झाला असून, आतापर्यंत १४ जणांचे मृतदेह सापडले आहेत. दरम्यान, या अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर आली असून, बसमधून प्रवास करत असलेले भाविक हे महाराष्ट्रातील असल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुमारे ४० भाविकांना घेऊन पोखरा येथून काठमांडूला जात असताना या बसला अपघात झाला आणि ती नदीत कोसळली.
याबाबत मिळत असलेल्या महाराष्ट्रातील एकूण ११० भाविक हे नेपाळमध्ये तीर्थयात्रेला गेले होते. प्रयागराज येथून तीन बसमधून हे प्रवासी नेपाळमध्ये गेले होते. हे प्रवासी भुसावळ आणि आसपासच्या भागाती असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान. या तीन बसपैकी एक बस घसरून अपघातग्रस्त झााली आणि पृथ्वीराज मार्गावरील दमौली मुगलिंग रोड खंड मार्स्यांगदी नदीत कोसळली. मुसळधार पावसामुळे नदीला पूर आलेला असल्याने अपघाताची तीव्रता वाढली. तसेच अपघातग्रस्त बसमधील काही प्रवासी हे वाहून गेले असण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
याबाबत राज्य सरकारमधील मदत आणि पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी सांगितले की, साधारणत: तासाभरापूर्वीच मला या अपघाताबाबत माहिती मिळाली आहे. याबाबत मी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशीही चर्चा झाली आहे. तसेच या दुर्घटनेत जखमी झालेल्यांच्या मदतीसाठी आणि मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह परत आणण्यासाठी नेपाळच्या दुतावासाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याबरोबरच उत्तर प्रदेशच्या रिलिफ कमिश्नरशी संपर्क करून नेपाळमध्ये अपघातग्रस्त झालेल्या बसमधील भाविकांच्या आणि इतर पर्यटकांच्या मदतीसाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
याबाबत नेपाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसचा क्रमांक UP FT 7623 हा आहे. ही बस नेपाळमधील पोखरा येथून काठमांडूला जात असताना नदीत पडला. सकाळी 11.30 च्या सुमारास हा अपघात झाला. तेथून जाणाऱ्या लोकांनी बस नदीत कोसळल्याचे पाहिले आणि पोलिसांना कळवले. ही बस उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील धरमशाला मार्केटमधील सौरभ केसरवानी यांच्या पत्नी शालिनी केसरवानी यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.