नेपाळ प्लेन क्रॅशची इमोशनल स्टोरी! कोर्टाचा तो निर्णय; महाराष्ट्रातील ते चौघे एकत्र आलेले, शेवटचे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 03:47 PM2022-05-30T15:47:00+5:302022-05-30T15:47:27+5:30
4 भारतीयांसह 22 प्रवशांना घेऊन जाणारे विमान नेपाळमध्ये कोसळल्याची घटना काल घडली. या अपघात ज्या 4 भारतीयांचा मृत्यू झाला, ते ठाण्याचे रहिवासी होते.
Nepal Plane Crash: 4 भारतीयांसह 22 प्रवशांना घेऊन जाणारे विमाननेपाळमध्ये कोसळल्याची घटना काल घडली. या अपघात ज्या 4 भारतीयांचा मृत्यू झाला, ते ठाण्याचे रहिवासी होते. आई-वडील आणि दोन मुलांचा एकाच वेळी मृत्यू झाल्यामुळे दुःख व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या कुटुंबाबाबत आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत दाम्पत्य घटस्फोटीत होतं आणि कोर्टाच्या आदेशानुसार एकत्र आलं होतं.
वर्षातून एकदा एकत्र यायचे
विमानअपघातात मृत्यू झालेल्या अशोक कुमार त्रिपाठी आणि वैभवी यांचा घटस्फोट झाला होता. पण, न्यायालयाच्या आदेशानुसार, दोघांना वर्षातून एकदा एकत्र येण्याचे आदेश दिले होते. आदेशानुसार अशोक 10 दिवस मुलांसह कुटुंबाला भेट देऊ शकत होता. कुटुंबात पती-पत्नीशिवाय 22 वर्षांचा मुलगा धनुष आणि 15 वर्षांची मुलगी रितिका होती. न्यायालयाचा आदेशानुसार, कुटुंब एकत्र यायचे, तोच त्यांच्या आयुष्याचा शेवट ठरला.
तीन दिवसांपूर्वी नेपाळला पोहोचले
न्यायालयाच्या आदेशानंतर 54 वर्षीय अशोक कुमार त्रिपाठी यांनी पत्नी वैभवी (51 वर्षे) आणि मुलगा आणि मुलगी यांच्यासह नेपाळला जाण्याचा विचार केला होता. यासाठी हे लोक तीन दिवसांपूर्वी नेपाळला पोहोचले होते. येथे पोहोचल्यानंतर यांनी मध्य नेपाळमधील जोमसोम या प्रसिद्ध पर्यटन शहराला भेट देण्याचे ठरवले. यासाठी तारा एअरलाइनमध्ये तिकीट काढले होते. मात्र, याच विमान अपघातात कुटुंबाचा अंत झाला.
वैभवी आजारी आईसोबत राहायची
घटस्फोटानंतर वैभवी बांदेकर त्रिपाठी आपल्या दोन मुलांसह ठाणे-नाशिक महामार्गावरील रुस्तम जी अथेना येथे राहत होती. मुलगा धनुष कॉलेजमध्ये शिकत होता तर मुलगी शाळेत शिकत होती. वैभवीची आई आजारी असते, त्यामुळे आईकडे राहून वैभवी तिची काळजी घेत होती. वैभवी नेपाळला गेल्यानंतर तिची मोठी बहीण संजीवनी तिच्या आईची काळजी घेण्यासाठी आली होती.
नेमकं काय झालं?
तारा एअरच्या 'ट्विन ऑटर 9N-AET' विमानाने रविवारी सकाळी 10 वाजता पोखरा येथून उड्डाण केले. टेक ऑफ केल्यानंतर 15 मिनिटांनी त्याचा कंट्रोल टॉवरशी संपर्क तुटला. यात, चार भारतीय, दोन जर्मन आणि 13 नेपाळी नागरिकांसह एकूण 22 जणांचा मृत्यू झाला.