निपाह विषाणूचा राज्याला धोका नाही; आरोग्य विभागाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 02:37 AM2019-06-06T02:37:22+5:302019-06-06T02:37:37+5:30
प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू, केरळमध्ये आढळला रुग्ण
मुंबई : गेल्या वर्षी केरळमध्ये निपाह विषाणूने थैमान घातल्यानंतर यंदा पुन्हा निपाहचा पहिला रुग्ण तेथे आढळला आहे. निपाह विषाणूचा धसका संपूर्ण देशानेच घेतला असून या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने राज्यभरात त्वरित प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आली असून सध्या तरी या विषाणूचा कोणताही धोका महाराष्ट्राला नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्य आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, रुग्णालये, डॉक्टर तसेच परिचारिका यांनी या आजारासंदर्भात घ्यावयाची काळजी आणि करायच्या उपाययोजना यासंदर्भातील मार्गदर्शिका राज्यातील सर्व रुग्णालयांना पाठविण्यात येत आहे. निपाह विषाणू आजारात विशेषत: ताप, मेंदूज्वर, अंगदुखी, डोकेदुखी, झोप येणे, मानसिक गोंधळ उडणे, बेशुद्ध पडणे अशी लक्षणे आढळतात. हा विषाणू मुख्यत्वे केरळ, ईशान्य भारत, बांगलादेश, पश्चिम बंगाल या ठिकाणांवरून पसरत असल्याने तेथून आलेल्या नागरिकांमध्ये या विषाणूची लक्षणे आढळल्यास तातडीने तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या विषाणूसाठी कुठलीही लस नसल्याने खबरदारी घेण्यात येत आहे. अशा रुग्णांनी तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल व्हावे. सरकारी रुग्णालयात यासाठी सुरू असलेल्या विलगीकरण कक्षात या रुग्णांना दाखल करण्यात यावे, असे आवाहन डॉ. आवअे यांनी केले. राज्यात या रोगासंदर्भात एकही रुग्ण आढळलेला नाही. पण तरीही खबरदारीच्या उपाययोजना म्हणून राज्यातील सर्व खासगी आणि शासकीय रुग्णालये, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक यांना सूचित करण्यात आले आहे, अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली. नागरिकांनीही खबरदारीचा उपाय म्हणून या विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या केरळमधील कोझीकोडे व इतर परिसरातील प्रवास टाळावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
असा होतो या विषाणूचा प्रसार
निपाह विषाणूचा प्रसार हा मुख्यत्वे फळांवर जगणाऱ्या वटवाघळांमार्फत होतो. वटवाघळांनी अर्धवट खाल्लेली फळे हाताळल्याने अथवा खाल्ल्याने हा आजार होतो. डुक्कर आणि इतर पाळीव प्राणी यांनाही बाधा होऊ शकते. १९९८ च्या मलेशियातील उद्रेकात वराह पालन करणारे शेतकरी मुख्यत्वे बाधित झाले होते. निपाह विषाणूची लागण माणसापासून माणसास होऊ शकते. रुग्णांवर उपचार करणारे वैद्यकीय कर्मचारी, रुग्णसेवा करणारे नातेवाईक यांना लागण होऊ शकते. वटवाघळाच्या स्रावामुळे दूषित झालेला खजुराच्या झाडाचा रस घेतल्यानेदेखील या विषाणूचा प्रसार होतो.
निपाह हा विषाणू मुख्यत्वे केरळ, ईशान्य भारत, बांगलादेश, पश्चिम बंगाल या ठिकाणांवरून पसरत असल्याने उघडकीस आले आहे.
लक्षणे व उपचार
निपाह विषाणू आजारात ताप, अंगदुखी, डोकेदुखी, झोप येणे, मानसिक गोंधळ उडणे, बेशुद्ध पडणे अशी लक्षणे आढळतात. या आजारावर कोणतेही विशिष्ट औषध नाही. रॅबाविरिन हे विषाणूविरोधी औषध वापरले जात असले तरी मुख्यत्वे लक्षणाधारित उपचार आणि साह्यभूत शुश्रूषा यावर भर दिला जातो.