नेरूळ, ऐरोलीत वर्षभरात सव्वा लाख रूग्णांवर उपचार
By admin | Published: March 3, 2017 02:55 AM2017-03-03T02:55:56+5:302017-03-03T02:55:56+5:30
महापालिकेच्या आरोग्य विभागाचा कारभार सुधारण्यावर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लक्ष केंद्रित केले
नामदेव मोरे,
नवी मुंबई - महापालिकेच्या आरोग्य विभागाचा कारभार सुधारण्यावर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लक्ष केंद्रित केले आहे. प्रथम संदर्भ रूग्णालयासह एकूण २६ ठिकाणी दिवसातून दोन वेळा ओपीडी सुरू केली आहे. नेरूळ व ऐरोली रूग्णालयामध्ये वर्षभरामध्ये १ लाख २६ हजार रूग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. याशिवाय प्रथम संदर्भ रूग्णालयाच्या कामकाजाचे आधुनिकीकरण करण्यात आले असून काही दिवसांमध्ये शहरवासीयांना अजून चांगल्या सुविधा उपलब्ध करून देता येणे शक्य होणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागावर लोकप्रतिनिधींसह नागरिकांकडून वारंवार टीका होवू लागली आहे. स्थायी समितीसह सर्वसाधारण सभेमध्येही आरोग्य यंत्रणेचे वारंवार वाभाडे काढण्यात आले आहे. ही स्थिती सुधारण्यासाठी आयुक्त तुकाराम मुुंढे यांनी लक्ष देण्यास सुरवात केली आहे. चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्यात येत आहेत. नेरूळ, ऐरोली व बेलापूरमधील नवीन रूग्णालये सुरू करण्यात आली आहेत. यासाठी २७ वैद्यकीय अधिकारी व ४७ तांत्रिक कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. वास्तविक सरकारी व निमसरकारी सेवेमध्ये डॉक्टर सहभागी होत नाहीत. पण प्रयत्न करून आवश्यक ते डॉक्टर उपलब्ध करून देण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. नेरूळ व ऐरोलीमध्ये माता बाल रूग्णालय सुरू झाले आहे. दोन्ही ठिकाणी आंतररूग्ण विभागामध्ये ७० रूग्णांना सामावून घेण्याची क्षमता असून यापुढे या परिसरातील रूग्णांना वाशीला जाण्याची गरज भासणार नाही. याशिवाय शहरातील २२ नागरी आरोग्य केंद्रांमध्ये पूर्वी सकाळी ओपीडी सुरू होती. आता सायंकाळीही ४ ते ६ या वेळेमध्ये ओपीडी सुरू करण्यात आली आहे. दोन वेळ ओपीडी सुरू असल्याने त्याचा लाभ नागरिकांना होवू लागला आहे. या दोन्ही ठिकाणी स्त्रीरोग, प्रसूती, बालरोग, त्वचाविकार, मनोविकार, कान, नाक, घसा व अस्थिव्यंग विभागाच्या ओपीडीही सुरू झाल्या आहेत. पूर्वी नेरूळमधील बाह्य रूग्ण विभागात महिन्याला जवळपास ९ हजार रूग्ण येत होते. हा आकडा आता १४ हजारांवर गेला आहे. आंतररूग्ण विभागातील पूर्वी सरासरी २५० रूग्ण दाखल होत होते आता तो आकडा ३५० पर्यंत गेला आहे. ऐरोलीमध्ये ९ बाह्य रूग्ण विभागामध्ये १० हजार रूग्ण येत होते. पालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे हा आकडा १५ हजार पेक्षा जास्त झाला आहे.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे २०१५ - १६ या आर्थिक वर्षामध्ये बाह्य रूग्ण विभागामध्ये ५२ हजार ९६३ व आंतररूग्ण विभागात २९८३ एवढ्या रूग्णांची नोंद झाली होती. २०१६ - १७ या वर्षामध्ये एप्रिल ते जानेवारीपर्यंत ९२ हजार ५१५ रूग्णांनी ओपीडीचा लाभ घेतला होता. आंतररूग्ण विभागात रूग्णांची संख्या ३२७२ एवढी झाली आहे असून रूग्णालयांना प्रतिसाद वाढत आहे.
>मे २०१६ पासूनच्या सुधारणा
ऐरोली व नेरूळमध्ये माता बाल रूग्णालय सुरू
प्रथम संदर्भ रूग्णालयासह २६ ठिकाणी दोन वेळ ओपीडी सुरू
प्रथम संदर्भ रूग्णालयात ई - रजिस्ट्रेशन सुरू
ऐरोली व नेरूळमध्ये ९ प्रकारची ओपीडी सुरू
२७ वैद्यकीय अधिकारी व ४७ तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती
ऐरोली व नेरूळमध्ये वर्षभरामध्ये १ लाख २६ हजार रूग्णांनी घेतले उपचार
आयपीडी विभागात २५७५ रूग्णांनी घेतला लाभ
ओपीडीमध्ये २०१५ - १६ च्या तुलनेत २३ हजार १४३ रूग्ण वाढले
महापालिकेच्या आरोग्य विभागातील त्रुटी सुधारून शहरवासीयांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बंद रूग्णालये सुरू केली आहेत. ओपीडी फक्त सकाळी होती ती सायंकाळीही सुरू केली आहे. उपचार घेणाऱ्या रूग्णांच्या संख्येतही वाढ झाली असून भविष्यात देशातील सर्वात चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- तुकाराम मुंढे, आयुक्त
प्रस्ताव रखडल्याने एनआयसीयू रखडले
महापालिकेच्या प्रथम संदर्भ रूग्णालयामधील एनआयसीयू व आयसीयू युनिटमध्ये व्हेंटिलेटर बंद आहेत. याकडे लक्ष वेधले असता साहित्य खरेदीचा प्रस्ताव जुलै महिन्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये सादर केला आहे. परंतु मंजुरी मिळाली नसल्याने अनेक कामे रखडली असल्याची खंतही व्यक्त केली आहे. पूर्णपणे आरोग्य व्यवस्था सक्षम झालेली नसली तरी ती सुधारली असून भविष्यात आणखी सुविधा उपलब्ध केली जाणार आहेत.
फोर्टीजला पुन्हा संधी नाही
फोर्टीज हिरानंदानीसोबत करार करताना अनेक त्रुटी राहिल्या होत्या. हॉस्पिटल व्यवस्थापनाने अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याने त्यांचा करार रद्द करण्यात आला आहे. भविष्यात तेथे अजून चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून पुन्हा तेथे सुपरस्पेशालिटी रूग्णालय सुरू करताना फोर्टीजला सहभाग घेता येणार नाही असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी झालेल्या चुका पुन्हा होवू दिल्या जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.