नेट-सेटधारक दिल्लीत धडकणार
By Admin | Published: May 17, 2016 05:28 AM2016-05-17T05:28:26+5:302016-05-17T05:28:26+5:30
नेट-सेटधारकांच्या विविध मागण्यांसंदर्भात १९ मे रोजी देशातील अनेक राज्यांतील नेट-सेटधारक जंतरमंतर दिल्ली येथे धडकणार आहेत
मुंबई : नेट-सेटधारकांच्या विविध मागण्यांसंदर्भात १९ मे रोजी देशातील अनेक राज्यांतील नेट-सेटधारक जंतरमंतर दिल्ली येथे धडकणार आहेत. ते तिथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करती. विद्यापीठ अनुदान आयोग आणि मानवसंसाधन विकास मंत्रालयाचे नेट-सेटधारकांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण करण्यात येत आहे.
नेट-सेटच अनिवार्य असावे, नेटसेटधारकांना पीएच.डी.प्रमाणे वेतनवाढी आणि इतर लाभ मिळावेत, सहप्राध्यापकांची नियुक्ती केंद्रीय पद्धतीने व्हावी, २००५ पूर्वीची पेन्शन योजना लागू करावी, नेटसेटधारकांची सेवा नेट-सेट उत्तीर्ण तारखेपासून ग्राह्य धरण्यात यावी या नेट-सेटधारकांच्या प्रमुख मागण्या आहेत. त्याचबरोबर बेरोजगार नेटसेटधारकांना २५ हजार बेरोजगारी भत्ता देण्यात यावा, एपीआय रद्द करून प्राध्यापकांची वेतन निश्चिती संस्था आणि महाविद्यालयाच्या रँकिंगनुसार करण्याचा विद्यापीठ अनुदान आयोग आणि मानव संसाधन विकास मंत्रालयाने घातलेला घाट रद्द करावा, अशीही मागणी या वेळी करण्यात येणार आहे. या मागण्यांसाठी क्वालिटी एज्युकेशन फोरम, इंडियन नेट-सेट असोसिएशन (इन्सा), सोसायटी फॉर क्वालिटी एज्युकेशन आणि अन्य संघटना लाक्षणिक उपोषण करणार आहेत. (प्रतिनिधी)