‘अडीच तास अगोदर’च्या नियमाचा नेट परीक्षार्थींना मनस्ताप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 05:55 AM2018-07-09T05:55:17+5:302018-07-09T05:55:30+5:30
सहायक प्राध्यापक पदांसाठी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या पात्रता परीक्षेला (नेट) वेळेपूर्वी अडीच तास परीक्षा केंद्रात हजर राहण्याची सक्ती सीबीएसईकडून करण्यात आली.
पुणे - सहायक प्राध्यापक पदांसाठी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या पात्रता परीक्षेला (नेट) वेळेपूर्वी अडीच तास परीक्षा केंद्रात हजर राहण्याची सक्ती सीबीएसईकडून करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात त्या वेळेत परीक्षा केंद्राचे दरवाजे उघडलेले नसणे, शिक्षकच आलेले नसणे आदी मनस्ताप देणारे अनुभव रविवारी विद्यार्थ्यांना आले.
परीक्षेच्या काही तास अगोदर प्रश्नपत्रिका फोडण्याचे प्रकार परीक्षा केंद्रात घडल्याचे उजेडात आले होते. त्याला अटकाव करण्यासाठी सीबीएसईकडून कडक नियमावली तयार केली आहे. त्यामध्ये परीक्षा सुरू होण्यापूर्वी अडीच तास अगोदर परीक्षा केंद्रात परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांनी हजर रहावे असे आदेश सीबीएसईकडून काढण्यात आले आहे. नेटचा पहिला पेपर साडे नऊला सुरू होणार असताना प्रत्यक्षात ७ वाजताच परीक्षा केंद्रात हजर राहण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या होत्या.
मात्र अनेक परीक्षा केंद्रांचे दरवाजे आठ नंतर उघडण्यात आले, तर अनेक ठिकाणी परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेले शिक्षकच आठनंतर आले. या परीक्षेसाठी उमेदवारांना परीक्षा खोलीत घड्याळ नेण्यासही बंदी घातली आहे. त्याचबरोबर स्वेटर, जर्किन्स, बॅग, मोबाइल बाहेर काढून ठेवण्यास सांगण्यात आले. यामुळे विद्यार्थी अधिकच त्रस्त झाले आहेत़ पालकांनाही याने अधिक मनस्ताप झाला आहे़
पहिला पेपर अवघड
यंदाच्या नेट परीक्षेतील पहिला पेपरची काठिण्यपातळी अधिक ठेवली होती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पहिला पेपर सोडविण्यासाठी वेळच पुरला नाही. या पेपरमधील प्रश्न किचकट असल्याने ते सोडविण्यासाठी अधिक वेळ लागत होता, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
तीनऐवजी दोनच पेपर
यंदाच्या नेट परीक्षेपासून परीक्षा पद्धतीमध्ये बदल केले होते. तीनऐवजी दोन पेपर घेण्यात आले. नेट परीक्षा पद्धतीमध्ये केलेल्या बदलाचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले.