'नेताजींचा राष्ट्राभिमान, त्याग सदैव प्रेरणादायी', उद्धव ठाकरेंकडून नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 02:47 PM2021-01-23T14:47:32+5:302021-01-23T14:48:48+5:30
Uddhav Thackeray : मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले. 'नेताजी सुभाषचंद्र बोस प्रखर राष्ट्रभक्त म्हणून देशाच्या सदैव स्मरणात राहतील. त्यांचा राष्ट्राभिमान, त्याग प्रेरणादायी राहील,' असे मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात म्हटले आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त यापुढे त्यांची जयंती 'पराक्रम दिन' म्हणून साजरी करण्यात येणार आहे. या पराक्रम दिनाच्याही उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित खासदार अरविंद सावंत यांनी देखील पुष्प अर्पण करून नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन केले.
नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजे ओतप्रोत राष्ट्रभक्तीचे प्रतिक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राचा नेताजींवर मोठा प्रभाव होता.सशस्र क्रांतीशिवाय दमनकारी ब्रिटिश राजवटीला हटविता येणार नाही, या उर्मीतून त्यांनी आझाद हिंद सेना उभी केली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना स्फुर्तीस्थानी मानणाऱ्या नेताजींनी स्वातंत्र्य संग्रामाच्या धगधगत्या कुंडात आयुष्य झोकून दिले, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
याचबरोबर, युवा पिढीसमोर त्यांनी मातृभूमीचे रक्षण आणि प्रखर राष्ट्रभक्तीचा उत्तुंग आदर्श ठेवला आहे. त्यांचा हा राष्ट्राभिमान आणि त्याग आपल्या सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी राहील. त्यांच्या राष्ट्रभक्तीला कोटी कोटी प्रणाम आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. pic.twitter.com/TAUervTasN
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 23, 2021