मोदींच्या ‘ट्रम्पकार्ड’वर नेटिझन्सचा लाफ्टर-शो
By admin | Published: November 10, 2016 03:53 AM2016-11-10T03:53:36+5:302016-11-10T03:53:36+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द हा ऐतिहासिक निर्णय काही क्षणात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द हा ऐतिहासिक निर्णय काही क्षणात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. अमेरिकेच्या अध्यक्षपद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या ‘ट्रम्पकार्ड’वर नेटिझन्सचा लाफ्टर-शो सोशल मिडियावर चांगलाच गाजला.
प्रत्येक घटनेवर नेटिझनस आपल्या खास शैलीत व्यक्त होण्यात आघाडीवर असतात. पंतप्रधानांनी मंगळवारी आपला निर्णय जाहीर करताच सोशल मिडियावरील प्रतिभेला एकच उधाणं आले. नेटिझन्सच्या शाब्दिक फटका-यांनी राजकारणातील धुरंधर, उद्योगपतींपासून नवरोबाच्या पाकीटावर डल्ला मारणा-या बायकांनाही टार्गेट केले. विनोदी फोटो आणि त्याला तितक्याच विनोदी कॅप्शननी फोन मेमरी भरुन जात होती. शिवाय फेसबूकवरील नोटीफिकेशनमध्येही मोठी वाढ झाली. टिष्ट्वटरवर इंडिया मॉडिफाईड’, लेट्स चेंज’, लेट्स ग्रो’ असे हॅशटॅग ट्रेंडींगमध्ये आले.
बुधवारी सकाळीदेखील हा ट्रेंड व्हायरल होता. दुपारनंतर अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले. यात डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारल्यानंतर तो अँगलही नेटीझन्स्नी आपल्या मेसेजेसमध्ये वापरण्यास सुरुवात केली. ‘नोटा रद्द आणि ट्रम्प सज्ज’ अशा आशयाचे मेसेजदेखील व्हायरल होवू लागले. एकूणात पंंतप्रधानांच्या या निर्णयाने लोकांची काही काळासाठी गैरसोय होणार असली देशाच्या भल्यासाठी निर्णय आवश्यक असल्याचा सूर नेटीझन्स्नी आळवला. विनोदी चिमटे काढतानाच ‘पैशांच्या मोह-मायेतून बाहेर पडा, नात्यांचे मोल जाणा’ असे सल्लेही मेसेजस्च्या माध्यमातून देण्यात येत होते.
...परिणाम खास होईल
पंतप्रधान मोदींच्या निर्णयावर व्हायरल झालेली पोस्ट -
‘एका रात्रीत देश हादरुन गेला आणि सुधारु ही लागला...
आता जे राहिल ते कष्टांच अन् जाईल ते भ्रष्टाचं...
थोडा त्रास होईल पण परिणाम खास होईल...’