महामार्गावर सुविधांचे जाळे

By admin | Published: January 15, 2015 05:12 AM2015-01-15T05:12:43+5:302015-01-15T05:12:43+5:30

राज्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर शहरांप्रमाणेच सुविधा देण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडला आहे.

The network of facilities on the highway | महामार्गावर सुविधांचे जाळे

महामार्गावर सुविधांचे जाळे

Next

यदु जोशी, मुंबई
राज्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर शहरांप्रमाणेच सुविधा देण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडला आहे. मैलोगणती सुनसान वाटणा-या या महामार्गांवर आता विविध सुविधांचे मोठे जाळे विणले जाणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारितील नगरविकास विभागाने या संबंधीचा निर्णय अलिकडेच घेतल्याने महामार्गांवर एकात्मिक सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्या उभारणीसाठी ०.५ इतका चटई निर्देशांक (एफएसआय) देण्यात आला आहे. एकात्मिक सुविधांतर्गत पेट्रोल पंप, विक्री व व्यवस्थापन कार्यालय, सेवा व दुरुस्ती केंद्र, सार्वजनिक स्वच्छतागृह, मॉटेल्स, रेस्टॉरंट, मॉल्स, मेडिकल स्टोअर, ट्रकचालकांसाठी रेस्टरुम, मोठ्या वाहनांसाठी पार्किंग तळ, बँकेचे एटीएमची उभारणी करण्याची परवानगी असेल. अ‍ॅग्रीकल्चर झोन, ना-विकास क्षेत्रात कमीतकमी १० हजार चौरस मीटर जागेवर या सुविधा उभारता येतील. शासनाने या संबंधीची सूचना जारी केली असून एक महिन्याच्या आता त्यावर सूचना व हरकती मागविल्या आहेत. त्यामुळे हायवे म्हटले की केवळ धाबे अन् पेट्रोल पंप हे आतापर्यंतचे चित्र बदलणार आहे. सध्याचे धाबे आणि पेट्रोल पंप कायम राहणार आहेत.
महामार्गांवर अपघात झाल्यानंतर जखमींना उपचारांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या परवानगीने आता महामार्गांवरच ट्रॉमा सेंटर उभारण्यात येतील. तसेच, पोलीस चौक्यांची उभारणी केली जाणार आहे.

Web Title: The network of facilities on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.