नेवाळी जमीनप्रश्नी लवकरच तोडगा काढणार
By admin | Published: April 27, 2016 03:51 AM2016-04-27T03:51:07+5:302016-04-27T03:51:07+5:30
नेवाळी येथील जमिनीचा वाद प्रदीर्घ काळ रेंगाळला असून शेतकऱ्यांचेही नुकसान होणार नाही आणि नौदलाचेही नुकसान होणार नाही, अशा पद्धतीने सन्माननीय तोडगा काढण्याची आवश्यकता आहे.
ठाणे/कल्याण : नेवाळी येथील जमिनीचा वाद प्रदीर्घ काळ रेंगाळला असून शेतकऱ्यांचेही नुकसान होणार नाही आणि नौदलाचेही नुकसान होणार नाही, अशा पद्धतीने सन्माननीय तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्री यांच्यासह संरक्षण मंत्री यांची भेट घेऊन मार्ग काढण्यात येईल,अशी ग्वाही ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी येथे दिली.
नेवाळी परिसरातील सुमारे १६०० एकर जमिनीवर स्थानिक ग्रामस्थ आणि नौदल असे दोघेही हक्क सांगत असून नौदलाने येथे संरक्षक भिंत बांधण्याचे काम काही ठिकाणी सुरू केले आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता वाढली आहे. याबाबत शेतकऱ्यांनीआपल्या व्यथा पालकमंत्री यांच्याकडे मांडल्या होत्या. त्यानुसारच मंगळवारी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी, महसूल विभागाचे अधिकारी, नौदलाचे अधिकारी आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक बोलवून दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी नौदलाला सध्या सुरू असलेले काम थांबवण्याची सूचना केली. याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांसह संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेऊन यातून सन्माननीय तोडगा काढू, असे सांगितले. (प्रतिनिधी)
>दोन्ही बाजूंनी संयम बाळगावे असे आवाहन
जवान आणि किसान हे दोघेही देशासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे दोघांपैकी कोणावरही अन्याय होता कामा नये. म्हणूनच या प्रश्नी मध्यममार्ग काढण्याची गरज असून चर्चेनेच हा प्रश्न सुटू शकेल. मात्र, जोरजबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाला तर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवेल. त्यामुळे दोन्ही बाजूंनी संयम बाळगावा,असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.