अजिबात ३४च्या खाली नको; भाजप नेत्यांचा दिल्लीत दबाव; जागावाटप अद्याप अनिश्चित; सेना, राष्ट्रवादीचे स्पष्टीकरण
By यदू जोशी | Published: March 8, 2024 06:52 AM2024-03-08T06:52:33+5:302024-03-08T06:53:42+5:30
...दुसरीकडे भाजप नेत्यांनी काहीही झाले तरी ३४ पेक्षा कमी जागा घेऊ नका, असा दबाव श्रेष्ठींवर वाढविल्याची खात्रीलायक माहिती आहे.
यदु जोशी -
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने राज्यातील ३५ उमेदवारांची यादी तयार केल्याची बातमी असताना, नाराज झालेल्या शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सन्मानजनक जागा देण्याचा आग्रह भाजपश्रेष्ठींकडे धरला. दुसरीकडे भाजप नेत्यांनी काहीही झाले तरी ३४ पेक्षा कमी जागा घेऊ नका, असा दबाव श्रेष्ठींवर वाढविल्याची खात्रीलायक माहिती आहे.
भाजप ३२ ते ३७ जागा लढणार असून १३ ते १६ जागा शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांना सोडणार असल्याच्या बातम्या माध्यमांनी दिल्या. प्रदेश व केंद्रीय भाजपने विविध कंपन्यांकडून सहा महिन्यांत सूक्ष्म सर्वेक्षणे केली. त्यासह भाजप व रा. स्व. संघाच्या यंत्रणेच्या फिडबॅकद्वारे ३५ जागा लढवाव्यात, अशी मागणी नेत्यांनी श्रेष्ठींकडे केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना भेटले. त्यावेळी, या नेत्यांनी ‘आमची मागणी ३५ चीच आहे, आणखी एक जागा मित्रपक्षांना सोडा, पण ३४ जागा लढवायलाच हव्यात’ असा आग्रह धरल्याची माहिती आहे.
जागावाटप वास्तविकतेवरच
जागावाटपाचा निर्णय वास्तविकतेच्या आधारित होईल. महायुतीत जागावाटपाबाबत गंभीर मतभेद नाहीत. दोन ते तीन जागांवर चर्चा सुरु असून जागावाटप लवकर मार्गी लागेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सध्याची जागांची आकडेवारी निराधार आणि विविध माध्यमांमध्ये आलेले आकडे योग्य नाहीत, असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी ‘लोकमत’ला सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आम्हाला एक-दोन दिवसांत दिल्लीत बोलविले आहे. त्यानुसार आता आम्ही तिन्ही पक्ष दिल्लीत जाऊन चर्चा करू, असेही पटेल म्हणाले.
शिवसेनेला नऊ वा दहा जागा मिळणार अशा बातम्या आल्यानंतर, काही नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विचारणा केली. सध्या काहीही ठरले नाही. आपले १३ खासदार आहेत. तेवढ्या वा अधिक जागेचा प्रयत्न करू, असे शिंदेंनी नेत्यांना सांगितले. सध्याची आकडेवारी निराधार असल्याचे सेनेच्या खासदाराने ‘लोकमत’ला सांगितले.