कधी पास कधी नापास - एकाच विद्यार्थ्याला ३ वेगवेगळ्या गुणपत्रिका
By Admin | Published: April 9, 2015 03:27 PM2015-04-09T15:27:19+5:302015-04-09T15:28:36+5:30
एका विद्यार्थ्याला दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका देण्यात आली. मात्र, ११ वर्षांनंतर तो दहावीत नापास असल्याचे सांगण्यात आले.
>बोर्डाचा प्रताप :दहावीच्या विद्यार्थ्याला तीन वेगवेगळय़ा गुणपत्रिका
पुणे : राज्य शिक्षण मंडळाकडून सोलापूर येथील एका विद्यार्थ्याला दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका देण्यात आली. मात्र, तब्बल ११ वर्षांनंतर काही कागदपत्रांसाठी त्याने पुणे विभागीय शिक्षण मंडळाकडे अर्ज केला असता तो दहावीमध्ये नापास असल्याचे कळविण्यात आले.
सोलापूर येथील दीपक बलभीम ढावरे या विद्यार्थ्याने २000 साली इयत्ता दहावीची परीक्षा दिली. त्या वेळी शिक्षण मंडळाकडून त्यास गणित विषयात नापास असल्याची गुणपत्रिका मिळाली. परिणामी त्याने अकरावी प्रवेशासाठी अर्ज केला नाही. परंतु, दीपककडून दहावीची ही गुणपत्रिका हरवली. त्यामुळे २00३ मध्ये त्याने विभागीय शिक्षण मंडळाकडे डुप्लिकेट गुणपत्रिका मिळण्यासाठी अर्ज केला.
त्या वेळी शिक्षण मंडळाकडून त्यास दहावीत उत्तीर्ण असल्याची गुणपत्रिका देण्यात आली. त्यामुळे दीपकने पुढे शिक्षण सुरू केले. पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षापर्यंतचे शिक्षण घेतले आणि डिसेंबर २0१४ मध्ये त्याने पुणे विभागीय शिक्षण मंडळाकडे बोर्ड सर्टिफिकेटसाठी अर्ज केला. परंतु त्यावेळी त्याला दहावीत नापास असल्याचे प्रमाणपत्र दिले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून पास असल्याचे प्रमाणपत्र मिळावे, असा अर्ज त्याने राज्य शिक्षण मंडळाकडे केला आहे.
दरम्यान, दीपक ढावरेला चूकून त्याच्या बहिणीचे गुण दिले गेले. परंतु, त्याने तिस-यांदा गुणपत्रकाची मागणी केली. त्या वेळी त्याला नापास असल्याचे प्रमाणपत्र दिल्याचे विभागीय शिक्षण मंडळाच्या वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले.
घटनाक्रम
२000 - दहावीच्या गुणपत्रिकेनुसार गणितात नापास
२00३ - उत्तीर्ण असल्याची गुणपत्रिका
२0१४ - नापास असल्याचे प्रमाणपत्र