शिर्डी विमानतळाभोवती वसविणार नवे ‘आशा’ शहर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 06:30 AM2021-09-30T06:30:35+5:302021-09-30T06:31:13+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंजुरी
मुंबई : शिर्डी येथील विमानतळाच्या सभोवताली सर्व सुविधांनी युक्त असे नवे शहर वसविण्यात येणार आहे. राज्यातील उत्तम विकास केंद्र म्हणून ते विकसित केले जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी येथे जाहीर केले.
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) संचालक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. वर्षा येथील समिती कक्षात झालेली ही ७६ वी बैठक होती. एरिया अराऊंड शिर्डी हब एअरपोर्ट म्हणजेच ‘आशा’ असे या भागाचे नाव असेल. त्याचा नावीन्यपूर्ण आणि सुनियोजित विकास एमएडीसी करणार आहे.
शिर्डी येथे देश-विदेशातून लाखो पर्यटक भेट देत असतात. शिर्डी विमानतळ व सभोवतालच्या परिसराचा विकास झाल्यास तेथे विविध प्रकल्पांची गुंतवणूक आकर्षित होईल आणि हे राज्यातील उत्तम विकास केंद्र बनेल, रोजगार निर्मिती होईल व विमानतळ परिसरात पायाभूत सुविधा निर्माण झाल्याने पर्यटन व्यवसाय आणखी वृध्दिंगत होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, एमएडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, विमानचालन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, सिकॉमचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. नितीन जावळे उपस्थित होते.