सदाभाऊ खोत यांच्या नव्या संघटनेचा नारळ आष्ट्यात फुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 04:05 AM2017-08-12T04:05:24+5:302017-08-12T04:05:39+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाल्यानंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वतंत्र संघटना काढण्याची तयारी सुरू केली असून, तिला ‘रयत शेतकरी संघटना’ असे नाव देण्यावर चर्चा सुरू आहे.
अशोक पाटील
इस्लामपूर (सांगली) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाल्यानंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वतंत्र संघटना काढण्याची तयारी सुरू केली असून, तिला ‘रयत शेतकरी संघटना’ असे नाव देण्यावर चर्चा सुरू आहे. आष्टा (ता. वाळवा) येथे दहीहंडी अथवा विजयादशमीच्या मुहूर्तावर या संघटनेचा नारळ फुटणार असल्याचे वृत्त आहे.
संघटनेतून हकालपट्टी झाल्यानंतर सदाभाऊ खोत द्विधावस्थेत आहेत. आजही त्यांच्या छातीवर शेतकरी संघटनेचा बिल्ला दिसतो. ते आता नव्या संघटनेच्या स्थापनेच्या तयारीला लागले आहेत. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील दुसºया क्रमांकाचे शहर असलेल्या आष्टा येथे भव्य दहीहंडीचे आयोजन करून त्या वेळीच नवीन संघटनेचा नारळ फोडण्याचा विचार पुढे आला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत सदाभाऊंचे पुत्र सागर खोत ज्या बागणी मतदारसंघातून उभे होते, त्या मतदारसंघालगतच आष्टा शहर आहे. सध्या सदाभाऊ खोत यांचे बहे येथील कार्यकर्ते गणेश शेवाळे नव्या संघटनेचा झेंडा कसा असावा, याची चाचपणी करत आहेत.