शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार नवी कोरी पुस्तके
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 04:27 AM2019-06-06T04:27:43+5:302019-06-06T04:27:57+5:30
बालभारती : राज्यभरातील शाळांना आतापर्यंत ९८.४० टक्के पुस्तकांचा पुरवठा
मुंबई : राज्यातल्या अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी नवी कोरी पुस्तके मिळणार आहेत. राज्य सरकारच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत बालभारतीने तब्बल ६ कोटी ३ लाख ७९ हजार ६९१ पुस्तकांचा पुरवठा सर्व जिल्ह्यांतील शाळांना केला आहे. त्यामुळे राज्यातील मराठी, हिंदी, उर्दू माध्यमाच्या अनुदानित शाळांना आत्तापर्यंत ९८.४० टक्के पुस्तकांचा पुरवठा पूर्ण झाला आहे.
ग्रेटर मुंबई, पश्चिम मुंबई, उत्तर मुंबई आणि दक्षिण मुंबईत मिळून यंदा ३८ लाख १० हजार ६५१ पुस्तकांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी ३७ लाख ६९ हजार ६०८ पुस्तकांचे वाटप बालभारतीकडून करण्यात आले आहे. याशिवाय राज्यातील अनेक शाळांत पुस्तकांचे १०० टक्के वाटप झाले आहे.
पुस्तकांचे वाटप करण्यात आलेल्या शाळांमध्ये पुणे, अहमदनगर, सोलापूर, पिंपरी-चिंचवड, अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, सातारा, नांदेड, लातूर या जिल्ह्यांतील शाळांचा समावेश आहे. त्यामुळे यंदा शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना नवीकोरी पुस्तके मिळणार आहेत.
दरम्यान, पुस्तकांची सगळ्यात जास्त मागणी नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे जिल्हा परिषद आणि पुणे महानगरपालिकेकडून बालभारतीकडे करण्यात आली होती, अशी माहिती बालभारतीतर्फे देण्यात आली.
मोफत पुस्तके का देतात?
मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत समग्र शिक्षा अभियान कार्यक्रमाच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी; तसेच विद्यार्थ्यांचे शाळेतील गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येतात.