वेळुकरांच्या पात्रता निश्चितीस नवी समिती
By admin | Published: February 25, 2015 02:33 AM2015-02-25T02:33:06+5:302015-02-25T02:33:06+5:30
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांची पात्रता पुन्हा तपासण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार कुलपतींनी आपल्या अधिकाराचा
तेजस वाघमारे, मुंबई
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांची पात्रता पुन्हा तपासण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार कुलपतींनी आपल्या अधिकाराचा वापर करीत वेळुकरांना पदापासून दूर राहण्याचे आदेश दिले आहेत. वेळुकर यांची पात्रता पुन्हा तपासण्यास नव्या शोध समिती नियुक्तीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी शोध समितीतील एका सदस्याच्या निवडीसाठी विद्यापीठाच्या विद्वत आणि व्यवस्थापन परिषदेची संयुक्त बैठक ९ मार्च रोजी बोलावली आहे.
विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाल्यापासून वेळुकर यांच्या नियुक्तीला प्राध्यापक, विद्यार्थी संघटनांसह अनेकांनी विरोध दर्शविला होता. शासन दरबारी पत्रव्यवहार करूनही दाद मिळत नसल्याने काही सदस्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. गेल्या महिन्यात न्यायालयाने वेळुकर यांची पात्रता पुन्हा तपासण्याचे आदेश दिले आहेत. चार आठवड्यांच्या आत समिती नियुक्त करून अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार कुलपती आणि राज्यपाल कार्यालयाने जुन्या शोध समितीला बाजूला सारून नवी शोध समिती निवडण्याचा निर्णय घेतला आहे.
शोध समितीमध्ये संबंधित विद्यापीठातील विद्वत व व्यवस्थापन परिषदेतून एक सदस्य निवडण्यात येतो. त्यानुसार नवी शोध समिती निवडण्यास ९ मार्च रोजी या परिषदेची संयुक्त बैठक आयोजित करण्याच्या हालचाली राज्यपाल कार्यालयाकडून सुरू झाल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीमध्ये एका सदस्याची निवड करून ती राज्यपाल कार्यालयाला कळविण्यात येणार आहे. त्यानुसार राज्यपाल नियुक्त एक सदस्य आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव अशी तीन सदस्यांची शोध समिती तयार होणार आहे. ही समिती वेळुकर यांच्या पात्रतेबाबत ठरविणार आहे.