किल्ले पर्यटनवृद्धीसाठी नवी शक्कल!
By admin | Published: May 13, 2014 07:00 PM2014-05-13T19:00:43+5:302014-05-14T01:59:36+5:30
महाराष्ट्राच्या दुर्गवैभवाचे जतन करीत तेथे पर्यटनवृद्धी व्हावी यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) नवा प्रकल्प हाती घेतला आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या दुर्गवैभवाचे जतन करीत तेथे पर्यटनवृद्धी व्हावी यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) नवा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत पर्यटनाच्या दृष्टिकोनातून राज्यातील किल्ल्यांचा विकास करण्यात येणार आहे.
देशोदेशीच्या पर्यटकांनी महाराष्ट्राच्या दुर्गवैभवाचा आनंद घ्यावा, त्या माध्यमातून किल्ल्यांची महती परदेशातील अभ्यासकांना आणि पर्यटकांना व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने हा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत राज्यातील ३५० किल्ल्यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी एकूण २० वर्षांचा कालावधी लागणार असून त्यासाठी प्रत्येक किल्ल्याला अडीच कोटी एवढा निधी मंजूर झाला आहे. या प्रकल्पांतर्गत किल्ल्याच्या आवारात पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा पुरविण्यात येणार आहेत. प्रकल्पातील काही किल्ले केंद्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित तर काही किल्ले राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागात अंर्तभूत आहेत. मात्र राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागाची परवानगी मिळाल्यामुळे त्या अंतर्गत असणार्या किल्ल्यांचे काम सुरु झाले आहे.
पर्यटनवृद्धीसाठीच्या या प्रकल्पात मुख्यत्त्वे किल्ल्याकडे जाणारा मार्ग, पाण्याचे व्यवस्थापन, फराळाचे स्टॉल्स, किल्लेभ्रमंतीसाठी योग्य सोयी-सुविधा, पर्यटकांना राहण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. प्रकल्पातील पहिल्या सहा किल्ल्यांचे काम सुरु झाले असून त्यात राजगड, तोरणा, राजमाची, लोहगड, सिंहगड आणि शिवनेरीचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
..........................
गेल्या काही वर्षांत किल्ल्यांच्या दुरावस्थेमुळे दुर्गवैभवाकडे पर्यटकांचे दुर्लक्ष झाले आहे. मात्र किल्ले पर्यटन वाढविण्याच्या दृष्टिकोनातून एमटीडीसीचा हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी ठरेल. या प्रकल्पाच्या माध्यमातून पुन्हा एकदा किल्ले पर्यटनाला बहर येईल. याशिवाय, काही किल्ल्यांच्या डागडुजीचे कामही पुरातत्त्व विभागामार्फत सुरु असल्याने महाराष्ट्राच्या दुर्गवैभवाचे संवर्धन होईल.
- राहुल वसईकर, कार्यकारी अभियंता, एमटीडीसी
.........................