रस्ते कामाला नवे ठेकेदार
By Admin | Published: August 23, 2016 01:58 AM2016-08-23T01:58:41+5:302016-08-23T01:58:41+5:30
दोषी ठेकेदारांना महापालिकेतच नव्हे तर सर्व सरकारी प्राधिकरणातूनही कायमचे हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली
मुंबई : रस्ते घोटाळ्यातील दोषी ठेकेदारांना महापालिकेतच नव्हे तर सर्व सरकारी प्राधिकरणातूनही कायमचे हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे़ त्याचवेळी पश्चिम उपनगरात डांबरी रस्त्यांचे काम हाती घेण्यात आले आहे़ त्यामुळे अखेर नवीन ठेकेदारांना संधी मिळणार असून या आला आहे़
३५२ कोटी रुपयांचा रस्ते घोटाळा उघड झाल्यानंतर रस्ते विभागात मोठ्या प्रमाणात सुरु असलेली अनियमितताही समोर आली होती़ याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटल्यानंतर गेली वर्षोन्वर्षे पालिकेच्या प्रत्येक कंत्राटावर हात साफ करणाऱ्या सहा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने
घेतला़ तरीही गेले काही दिवस या कारवाईचे भिजतं घोगडं ठेवणाऱ्या पालिकेला अखेर ठेकेदारांवर कारवाई करणे भाग पडले आहे़
पोलिसांमार्फत कारवाई सुरु झाल्यानंतर आता पालिकेनेही सहा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरु केली आहे़ ही
कारवाई पुढच्या आठवड्यात पूर्ण होईल़ त्यामुळे रस्त्यांच्या नवीन कामांसाठी नव्या ठेकेदारांचा
शोध सुरु झाला आहे़ पश्चिम उपनगरातील ४५ रस्त्यांच्या कामांसाठी ५४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत़ स्थायी समितीची मंजुरी मिळाल्यानंतर पावसाळा संपताच या कामाला सुरुवात होणार आहे़ (प्रतिनिधी)
>अशी आहेत
रस्त्यांची कामे
रस्त्यांची झीज होणे, भेगा पडणे, विविध युटिलिटिज कंपनीमार्फत चर खणणे अशा कारणांमुळे प. उपनगरातील रस्ते खराब झाले. या रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी ५४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत़ अंधेरी पूर्वेला नऊ रस्ते, अंधेरी पश्चिम एक आणि कांदिवली पश्चिम २३ रस्त्यांचे काम पावसाळ्यानंतर सुरु होणार आहेत़ याचे काम मे़ देवा इंजिनिअर्सला तर खार, वांद्रे आणि अंधेरी पूर्व येथील काही रस्त्यांचे काम मेसर्स कोनार्क स्ट्रक्चरल इंजिनिअर्सला देण्यात आले आहे़
> नवीन ठेकेदारांची कमी बोली
गेल्या काही वर्षांमध्ये ठेकेदारांची मक्तेदारी प्रस्थापित झाल्यामुळे त्यांची मुजोरीही वाढली होती़ त्यामुळे जादा बोली अथवा कंत्राटाच्या एकूण किंमतीपेक्षा ५० ते ६० टक्के कमी बोली ठेकेदार लावत होते़ ज्यामुळे खर्च १०० रुपये असेल तर ६० रुपये ठेकेदार खर्च करीत असल्याने कामाच्या दर्जेबाबतही साशंकता निर्माण होत होती़ कामं निकृष्ट दर्जाची केली जात असल्याचेही समोर आले आहे़ मात्र या कामासाठी मे़ देवा इंजिनिअर्सने १५ टक्के कमी बोली लावली आहे़ अन्य रस्त्यांच्या कामासाठी मे़ कोनार्क स्ट्रक्चल इंजिनिअर्सने १३़६८ टक्के कमी बोली लावली आहे़
>दुसऱ्या अहवालाच्या प्रतीक्षेत
दक्षता खात्याचे प्रमुख अभियंता एसक़ोरी यांच्या अध्यक्षतेखाली २२६ रस्त्यांची चौकशी सुरु आहे़ पहिला चौकशीचा अहवाल सादर केल्यानंतर दुसरी फेरी तत्काळ सुरु झाली़ त्यानुसार रस्त्यांची पाहणीही करण्यात आली़ मात्र अद्याप अहवाल सादर झालेला नाही़ दक्षता खात्याला याबाबत वारंवार सुचना करुनही अहवाल सादर करण्यात आलेला नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले़
>सार्वजनिक पैशांची नासाडी
३५२ कोटींचा घोटाळा ही सार्वजनिक पैशांची नासाडी असून निकृष्ट दर्जाच्या कामासाठी जबाबदार ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस चौकशी समितीने पहिल्या फेरीच्या अहवालातून केली होती़
यांच्यावर झाली कारवाई
रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता अशोक पवार आणि दक्षता खात्याचे प्रमुख अभियंता उदय मुरुडकर यांचे निलंबन व अटक, थार्डपार्टी आॅडिट कंपनीच्या २२ अभियंत्यांना अटक, के़आऱ कन्स्ट्रक्शन, महावीर इन्फ्रा, आरपीएस, आऱ के़ मदानी, जे़ कुमार, रेलकॉन या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकाणे, नोंदणी रद्द करणे व त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रारीची प्रक्रिया पालिकेने पूर्ण केली़ आतापर्यंत तीन ठेकेदारांना अटक झाली आहे़