नवा वाद! चंद्रकांत पाटील म्हणाले, शाळेसाठी फुले-आंबेडकरांनी भीक मागितली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 08:16 AM2022-12-10T08:16:36+5:302022-12-10T08:17:03+5:30
विरोधक म्हणाले ‘लोकवर्गणी’ माहित नाही का?
मुंबई/औरंगाबाद : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आले आहेत. भाजपच्या नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून वातावरण तापले असताना पाटील यांच्या वादग्रस्त विधानाने विरोधकांच्या हाती कोलीत मिळाले.
पैठणमध्ये शुक्रवारी कार्यक्रमात बोलताना पाटील यांनी फुले-आंबेडकरांनी शाळेसाठी भीक मागितली, असे विधान केले. शाळा सुरू करताना तुम्ही सरकारी अनुदानावर अवलंबून का राहता?
डॉ. आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करताना सरकारने त्यांना अनुदान दिले नाही. त्यांनी लोकांकडे भीक मागितली, असे ते म्हणाले. या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागताच पाटील यांनी आपल्या विधानाचा विपर्यास केला गेल्याचे स्पष्टीकरण दिले.
यापूर्वीची वादग्रस्त विधाने
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत प्रतिक्रिया देताना, खासदार आहात ना, समजत नसेल, तर घरात बसा, स्वयंपाक करा, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना, मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. आपल्याला दुःख झाले, पण आपण दुःख पचवून पुढे गेलो, असे वक्तव्य पाटील यांनी केले होते. डिसेंबर २०११ मध्ये विधान परिषद निवडणुकीतील विजयानंतर बोलताना, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केली, अटलबिहारी वाजपेयी आणि मोदींनी त्यावर कळस चढवण्याचे काम केले, असे वक्तव्य त्यांनी केले होते. मूठभर शेतकऱ्यांच्यावर कायदे ठरत नसतात, असे म्हणत शेतकरी कायद्याला विरोध करणाऱ्यांवर चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती.
पाटील यांना भीक, लोकवर्गणी व देणगी यातील फरक कळतो का? त्यांनी या महापुरुषांच्या कार्याचाच नाही तर बहुजन समाजाचाही अपमान केला. - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
महापुरुषांच्या रचनात्मक कार्याच्या उभारणीला भीक मागण्याची उपमा देणे, हा त्यांचा जाणूनबुजून केलेला अपमानच. - जयंत पाटील,
प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी
आचारसंहितेचा विसर
अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर, राज्यातील राजकीय संस्कृती हा चिंतेचा विषय झाला आहे, अशी भूमिका मांडून याबाबत राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काही आचारसंहिता तयार करावी, अशी सूचना चंद्रकांत पाटील यांनी केली होती.