साहित्य संमेलनाचा नवा वाद : अध्यक्ष विदर्भाचा की पश्चिम महाराष्ट्राचा, साहित्य वर्तुळात रंगल्या चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 03:38 AM2017-09-12T03:38:08+5:302017-09-12T03:38:28+5:30

९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा विवेकानंद आश्रमावर शिक्कामोर्तब झाले आहे. संमेलन विदर्भात होत असताना संमेलनाध्यक्षपदाचा मान विदर्भाला मिळणार की पश्चिम महाराष्ट्राला मिळणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

 The new controversy for literature conferences: Discussion of Vidarbha or Western Maharashtra, in literature circles | साहित्य संमेलनाचा नवा वाद : अध्यक्ष विदर्भाचा की पश्चिम महाराष्ट्राचा, साहित्य वर्तुळात रंगल्या चर्चा

साहित्य संमेलनाचा नवा वाद : अध्यक्ष विदर्भाचा की पश्चिम महाराष्ट्राचा, साहित्य वर्तुळात रंगल्या चर्चा

Next

 पुणे : ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा विवेकानंद आश्रमावर शिक्कामोर्तब झाले आहे. संमेलन विदर्भात होत असताना संमेलनाध्यक्षपदाचा मान विदर्भाला मिळणार की पश्चिम महाराष्ट्राला मिळणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. विदर्भातील उमेदवाराला विदर्भ साहित्य संघ आणि आणि आयोजक संस्था यांची मते मिळण्याची दाट शक्यता असल्याने, त्यांचे पारडे जड राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यंदा सारस्वतांचे नेतृत्व कोण करणार, याबाबत साहित्य वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.
९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदासाठी सध्या चार इच्छुकांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये अनुवादक रवींद्र गुर्जर, लेखक किशोर सानप, अक्षरमानवचे राजन खान आणि डॉ. रवींद्र शोभणे ही नावे चर्चेत आहेत.
यांपैकी दोन इच्छुक पश्चिम महाराष्ट्रातील, तर दोन विदर्भातील आहेत. गेल्या काही साहित्य संमेलनांची पार्श्वभूमी पाहता, आयोजक संस्थेच्या मतांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. संमेलन विदर्भात होत असताना विदर्भ साहित्य संघ आणि आयोजक संस्था यांची निर्णायक २५० मते ज्या उमेदवाराला मिळतील, त्याचे पारडे जड राहणार आहे.
मराठवाडा साहित्य परिषदेने न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे नाव सुचवले होते. मात्र, अध्यक्षपद बिनविरोध मिळावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली असून, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते अर्ज दाखल करण्यासही इच्छुक नाहीत.
साहित्य अकादमी विजेते कवी आणि कादंबरीकार डॉ. सदानंद देशमुख यांचे नाव सध्या चर्चेत नसले तरी विदर्भ साहित्य संघाकडून
त्यांचे नाव सुचवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांनी आयुष्यभर बळीराजासाठी लेखन केले असून, त्यांचे नाव सर्वसमावेशक ठरू शकेल, अशी चर्चाही साहित्य वर्तुळात रंगली आहे.

संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणूक
संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार, ५ आॅक्टोबरला महामंडळाकडून मतदारयादी उपलब्ध केली जाणार आहे. महामंडळाकडे अध्यक्षपदासाठी नावे देण्याची १४ आॅक्टोबर ही अंतिम तारीख असून, २३ आॅक्टोबर रोजी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. १० डिसेंबर रोजी ९१ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे, अशी माहिती डॉ. श्रीपाद जोशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद आणि विदर्भ साहित्य संघाची प्रत्येकी १७५ मते, तेलंगणा मराठी साहित्य परिषद (हैदराबाद), मराठी साहित्य सेवा मंडळ (गोवा), कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद (गुलबर्गा), छत्तीसगढ मराठी साहित्य परिषद (बिलासपूर) यांची प्रत्येकी ४० मते, महाकोशाचे विश्वस्त, पदाधिकारी आणि पूर्वाध्यक्षांची मतेही महत्त्वाची भूमिका बजावतील.

मराठी भाषिकांमध्ये विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र असा भेदाभेद नाही. निवडणूक प्रक्रियेला माझा कोणताही विरोध नाही. आजवर मी महामंडळाच्या भूमिकेला कधी विरोध तर योग्य ठिकाणी सहकार्यही केले आहे. या प्रक्रियेत राजकारणाचा सामना करावा लागला तरी तो प्रामाणिकपणे करेन. मला या माध्यमातून लेखक म्हणून स्वत:ची मिरवणूक काढायची नाही. मात्र, आजवर कामातून मांडत आलेली समन्वयाची, माणुसकीची भूमिका मांडण्याची संमेलन ही मोठी आणि योग्य जागा आहे. संमेलनाध्यक्षांचा आवाज महाराष्ट्र ऐकतो, त्यांच्या विधानांची नोंद घेतली जाते. या भूमिकेतून माणुसकीसाठी काम करण्याचा आनंद मिळू शकेल. खूप लोकांनी आग्रह केल्यामुळे मी उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून आॅक्टोबरमध्ये अर्ज दाखल करेन.
- राजन खान

संतसाहित्याचा अभ्यासक म्हणून मी विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. माझी आजवर २८ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आजवरच्या कारकिर्दीत मी सृजनात्मक, विविधांगी लेखन करून साहित्यसेवा केली आहे. मी नुकताच बृहन्महाराष्ट्राचा दौैरा केला. साहित्य महामंडळाच्या समाविष्ट संस्थांना भेटी दिल्या. आता मी बडोदा, भोपाळ, इंदोर आणि गोवा या ठिकाणांना सप्टेंबरपर्यंत भेटी देणार आहे. मी चारही घटक संस्थांमधून अर्ज दाखल करणार आहे.
- किशोर सानप

संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या दृष्टीने मी महिन्या-दीड महिन्यापासून तयारीला सुरुवात केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त साहित्यप्रेमींपर्यंत पोचण्याचा माझा प्रयत्न असेल. प्रभावी पुस्तक प्रकाशन आणि वितरण, घरोघर वाचनालय (ग्रंथघर), चांगले अनुवादक निर्माण करणे आणि ई-बुक्स, जुन्या ग्रंथांचे (डिजिटल) जतन व अभ्यासकांना त्यांची उपलब्धी हे कार्य संमेलनाध्यक्ष म्हणून करण्याचा माझा मानस आहे. आजवर अनुवादकांना संमेलनाध्यक्षपदाचा मान मिळालेला नाही. त्यामुळे यंदा यशाची खात्री असून, महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून अर्ज दाखल करेन. - रवींद्र गुर्जर

संमेलनाध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून माझी तयारी पूर्ण झाली आहे. मी नुकताच बृहन्महाराष्ट्राचा दौरा केला. आता महाराष्ट्रातील साहित्य संस्था, साहित्यप्रेमींना भेटी देणार असून, त्यांच्याकडून आतापासून चांगला पाठिंबा मिळत आहे. संपूर्ण विदर्भ माझ्यासोबत असेल, यात शंका नाही.
- रवींद्र शोभणे

संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक लढायला माझा पूर्ण विरोध आहे. त्यामुळे मी अर्ज दाखल करणार नाही. अध्यक्षपद बिनविरोध मिळाल्यास माझी हरकत नसेल. मी सध्या एका कादंबरीच्या निर्मितीमध्ये व्यस्त असून, त्या माध्यमातून साहित्य चळवळीसाठी पोषक काम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मराठी साहित्य संमेलनांमध्ये माझा नित्य सहभाग असतोच; मात्र निवडणुकीला माझा विरोध आहे.
- डॉ. सदानंद देशमुख

Web Title:  The new controversy for literature conferences: Discussion of Vidarbha or Western Maharashtra, in literature circles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे