दहावीचा नवीन अभ्यासक्रम : पाठांतराऐवजी आकलनावर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 01:32 AM2018-06-11T01:32:12+5:302018-06-11T01:32:12+5:30
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून (२०१८-१९) दहावीच्या अभ्यासक्रमातील बदलांबरोबरच परीक्षापद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय राज्य मंडळाकडून घेण्यात आला आहे.
पुणे - यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून (२०१८-१९) दहावीच्या अभ्यासक्रमातील बदलांबरोबरच परीक्षापद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय राज्य मंडळाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता घोकंपट्टी करून परीक्षा देण्याऐवजी जास्तीत जास्त आकलन करण्यावर भर द्यावा
लागणार आहे.
येत्या १५ जूनपासून शाळांना सुरुवात होणार आहे. यंदाच्या वर्षीपासून पहिली, आठवी व दहावीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला आहे. विशेषत: दहावीच्या अभ्यासक्रमाच्या बदलाबरोबरच परीक्षापद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले आहेत. भाषा विषयांबरोबरच गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल अशा सर्वच विषयांच्या प्रश्नपत्रिकांची जागा आता कृतिपत्रिका घेणार आहेत. या कृतिपत्रिकांच्या अनुषंगाने अभ्यासक्रमामध्येही योग्य ते बदल करण्यात आले आहेत.
शालेय अभ्यासक्रमात होत असलेले आमूलाग्र बदल समजून घेण्यासाठी मराठी विज्ञान परिषदेच्यावतीने यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रविवारी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्य मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख, मंडळाच्या अभ्यास समिती सदस्या डॉ स्नेहा जोशी (मराठी), डॉ. शिवानी लिमये (इतिहास), डॉ. सुलभा विधाते (विज्ञान), मराठी विज्ञान परिषदेचे ज्येष्ठ सभासद डॉ. विद्याधर बोरकर, कोषाध्यक्ष भालचंद्र अत्रे, कार्यवाह प्रा. नीता जोशी, अॅड. अंजली देसाई उपस्थित होते.
नवीन अभ्यासक्रमाची ठळक वैशिष्ट्ये
- संपूर्ण अभ्यासक्रम व मूल्यमापन पद्धत विद्यार्थीकेंद्रित
- स्वानुभव, स्वविचार, स्वकल्पना व स्वीकृती या चतु:सूत्रीवर आधारित अभ्यासक्रम
- अभ्यासक्रमातून तार्किक विचार, कार्यकारणभाव, नवनिर्मिती आणि चिकित्सक प्रवृत्तीची जोपासना
- पाठ्यपुस्तकांमध्ये अनेक लिंक आणि संदर्भ दिलेले असून, त्याआधारे विद्यार्थ्यांना जाणून घेता येईल सविस्तर माहिती
- विद्यार्थ्यांच्या स्वत:ची मते व्यक्त करण्यास प्रवृत्त करणारा अभ्यासक्रम
- अनुभवांवर आधारित लेखनाला महत्त्व
- पाठ्यपुस्तकातील माहिती व अभ्यासाचा उपयोग व्यावहारिक जगात कसा करावा, याबाबत मार्गदर्शन
अभ्यासक्रम महत्त्वाचा ठरणार
- तंत्रज्ञानामध्ये वेगाने होत असलेल्या बदलांमुळे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेली माहिती विद्यार्थी विविध मार्गाने घेतात. अशा वेळी त्यांना माहिती आणि पाठ्यपुस्तकांच्या पलीकडचे ज्ञान देण्याची गरज लक्षात घेऊन नवीन अभ्यासक्रम बनविण्यात आला आहे. त्याला अनुसरूनच मूल्यमापन पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांची उपयोजन व आकलनशक्ती वाढविण्यास हा अभ्यासक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
दहावीच्या अभ्यासक्रमात आणि परीक्षापद्धतीत होणारे बदल हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून केले आहेत. कृतिशील, सर्जनशील, वैचारिक, उपयोजित ज्ञानावर आधारलेला हा अभ्यासक्रम आहे. आकलन आणि उपयोजन पद्धतीला अधिक महत्त्व दिले असून, त्यातून विद्यार्थ्यांची संशोधकवृत्ती विकसित होईल. नवा अभ्यासक्रम म्हणजे विद्यार्थी गुणार्थी नव्हे, तर गुणवान व्हावा, यावर भर देणारा आहे.
- शकुंतला काळे,
अध्यक्षा, राज्य मंडळ
विज्ञान विषयाचा अभ्यास करताना प्रात्यक्षिकांवर भर दिला पाहिजे. तार्किक विचार, कार्यकारणभाव, नवनिर्मिती आणि चिकित्सक प्रवृत्ती जोपासत विज्ञान समजून घेतले पाहिजे. संश्लेषण, वर्गीकरण, विश्लेषण आणि तुलना या गोष्टी आपल्या अभ्यासात असाव्यात. बहुधीश विचारांना प्राधान्य, सृजनशील, कृतिशील विचारपद्धतीवर भर दिला आहे. त्याचे मूल्यांकनही त्याच पद्धतीने आहे.
- डॉ. सुलभा विधाते,
सदस्या, विज्ञान अभ्यास मंडळ
वाचन, आकलन आणि निरीक्षण याला आता अधिक महत्त्व येणार आहे. मराठी विषयाचा नाही, तर मराठी भाषेचा अभ्यास करायचा आहे, हे विद्यार्थ्यांनी ध्यानात घेतले पाहिजे. पारंपरिक आणि वाचिक उत्तरांपेक्षा अनुभवजन्य लिहिण्याला प्राधान्य द्यावे. लेखन सराव महत्त्वाचा असून, पालकांनी त्यासाठी मुलांना प्रोत्साहित केले पाहिजे.
- डॉ. स्नेहा जोशी, सदस्या, मराठी अभ्यास मंडळ
इतिहासाच्या अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल आहेत. विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना देणारा आणि स्वमत प्रकट करण्याला प्रोत्साहित करणारा असा अभ्यासक्रम आहे. ऐतिहासिक प्रसंगांचे वर्णन वाचून त्यावर विचार करून ते असे का झाले असेल, याविषयी लिहायचे आहे. त्यामागचा तार्किक भाव आपल्या शब्दांत मांडण्याची मुभा या अभ्यासक्रमात आहे.
- डॉ. शिवानी लिमये,
इतिहास अभ्यास मंडळ सदस्य
पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे, सर्जनशील, व्यक्तिमत्त्व विकास समोर ठेवून दहावीचा नवीन अभ्यासक्रम तयार केला आहे. पुस्तके वाचावीशी वाटतील, अशी त्याची मांडणी आहे. नव्या पुस्तकात नावीन्यपूर्ण स्वाध्याय असून, स्वत:ची मते व्यक्त करण्यास प्रवृत्त केले आहे. संकल्पनात्मक आणि संशोधनात्मक अभ्यास यामुळे विद्यार्थी चिकित्सक आणि सर्जनशील बनेल.
- डॉ. अ. ल. देशमुख,
शिक्षणतज्ज्ञ