मराठवाड्यात नव्याने धरणे बांधावी लागतील, जयंत पाटील यांचे सुतोवाच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 09:11 AM2021-11-29T09:11:53+5:302021-11-29T09:12:33+5:30

Marathwada News: मराठवाड्यातील पाण्याचे दुर्भिक्ष कमी करण्यासाठी नव्याने धरणे बांधावी लागतील. १०२ ऐवजी १२२ टीएमसी क्षमतेपर्यंत धरणे बांधली, तरी किमान ९० टीएमसी पाणी वापरता येईल, असे मत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी रविवारी व्यक्त केले. 

New dams will have to be built in Marathwada, says Jayant Patil | मराठवाड्यात नव्याने धरणे बांधावी लागतील, जयंत पाटील यांचे सुतोवाच

मराठवाड्यात नव्याने धरणे बांधावी लागतील, जयंत पाटील यांचे सुतोवाच

googlenewsNext

औरंगाबाद : मराठवाड्यातील पाण्याचे दुर्भिक्ष कमी करण्यासाठी नव्याने धरणे बांधावी लागतील. १०२ ऐवजी १२२ टीएमसी क्षमतेपर्यंत धरणे बांधली, तरी किमान ९० टीएमसी पाणी वापरता येईल, असे मत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी रविवारी व्यक्त केले. 
मध्य गोदावरी खोऱ्यातील १९.२९ आणि पैनगंगा खोऱ्यातून ४४.५४ टीएमसी पाणी मराठवाड्यात वापरण्यास परवानगी दिल्याबद्दल मराठवाडा अभियंता मित्रमंडळातर्फे आयोजित सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, रोहयोमंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आ. सतीश चव्हाण आदींची उपस्थिती होती.     
जलसंपदामंत्री पाटील म्हणाले, मध्य गोदावरी खोरे आणि पैनगंगा खोऱ्यातील पाणी मिळाले आहे. त्यासाठी ५ ते ७ वर्षांत बरेचसे प्रकल्प पूर्ण होऊन मराठवाड्याला शाश्वत पाणी मिळेल. १९.२९ टीएमसी वापरामुळे मराठवाड्यातील धारूर, परळी, पालम, पूर्णा, कंधार, लोहा, भोकर, औंढा, वसमत तालुक्यात नवीन प्रकल्प बांधता येतील. नांदेड जिल्ह्यातील लहान-मोठ्या ४० प्रकल्पांना आजच मंजुरी दिली आहे. बीड जिल्ह्यातील प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात येईल. ४४.५४ टीएमसीतून हिंगोली, औंढा, कळमनुरी, हिमायतनगर, माहूर, यवतमाळ परिसराला फायदा होईल. एक हजार अभियंत्यांची कमतरता आहे. मात्र, लवकरच भरतीचा मार्ग मोकळा होईल, असेही पाटील यांनी सांगितले. 

दमणगंगेचे पाणी वळविण्यासाठी प्रयत्न सुरू 
सह्याद्रीच्या माथ्यावरून पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ठाणे जिल्ह्यातून ११५ टीएमसी पाणी, कोकणातून पाणी आणू शकतो. त्यासाठी अंदाजपत्रक, नव्याने सर्व्हेक्षणाची गरज आहे. नार-पार, दमणगंगा, वैतरणा, उल्हास नदीच्या उपखोऱ्यांत ३७० अब्ज घनफूट पाणी शिल्लक आहे. ११५ अब्ज घनफूट पाणी वळू शकते. ७.५ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यात आले आहे.

Web Title: New dams will have to be built in Marathwada, says Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.