विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना मिळाली करिअरची नवी दिशा
By admin | Published: June 6, 2016 12:52 AM2016-06-06T00:52:02+5:302016-06-06T00:52:02+5:30
दहावी-बारावीचा महत्वाचा टप्पा पार केल्यानंतर विद्यार्थी-पालक सभोवताली दिसणाऱ्या करिअरच्या अनेक संधी शोधत असतात. या संधी शोधणाऱ्या अनेकांना ‘लोकमत अॅस्पायर’ या
पुणे : दहावी-बारावीचा महत्वाचा टप्पा पार केल्यानंतर विद्यार्थी-पालक सभोवताली दिसणाऱ्या करिअरच्या अनेक संधी शोधत असतात. या संधी शोधणाऱ्या अनेकांना ‘लोकमत अॅस्पायर’ या शैक्षणिक प्रदर्शनामध्ये करिअरची दिशा मिळाली. रविवारी समारोप झालेल्या या प्रदर्शनाला तीनही दिवस विद्यार्थी-पालकांनी मोठ्या संख्येने भेट दिली.
म्हात्रे पूल येथील पंडित फार्म येथे शुक्रवारपासून ‘लोकमत अॅस्पायर’ हे शैक्षणिक प्रदर्शन सुरू झाले होते. सकाळी १०.३० ते रात्री आठ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले होते.
विद्यार्थ्यांना एकाच छताखाली शहरातील विविध शैक्षणिक संस्था, तेथील अभ्यासक्रम, उपक्रमांची माहिती तसेच करिअरच्या दिशा निवडण्याचे पर्याय या प्रदर्शनात मिळाले. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच प्रदर्शनाला भेट देण्यासाठी विद्यार्थी, पालकांनी गर्दी केली होती. काही दिवसांपूर्वीच बारावीचा निकाल लागल्याने अनेकांना करिअरबाबत प्रश्न सतावत होते. प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळाले. सर्वच विद्यार्थ्यांसाठी प्रदर्शन फायदेशीर ठरले.
अनेक जण दहावी-अकरावीत असल्यापासूनच करिअरची स्वप्ने रंगवत असतात. पण ही स्वप्न पूर्ण करण्यासाठीचे योग्य मार्गदर्शन त्यांना मिळत नाही. ‘लोकमत अॅस्पायर’ या प्रदर्शनाला भेट देवून अनेकांनी स्वप्ने पूर्ण करण्याच्या दिशेने पाऊल टाकले. रविवारी प्रदर्शनाचा अखेरचा दिवस असल्याने उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
मेडिकल, इंजिनीअरिंग, आर्किटेक्ट, फॅशन, ग्राफिक्स, अॅव्हीएशन, हॉटेल मॅनेजमेंट, फॉरेन लँग्वेजेस, मॅनेजमेंट, स्पोकन इंग्लिश, बँकिंग, डिस्टन्स लर्निंग, आयटी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यांसह विविध क्षेत्रातील करिअरच्या संधीची माहिती विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी घेतली. यावेळी प्रत्येक दालनासमोर विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती.
प्रत्येक संस्थेच्या प्रतिनिधींनीही त्यांचा प्रत्येक प्रश्न ऐकून घेत त्यांचे समाधान केले. त्यामुळे हे प्रदर्शन विद्यार्थी-पालकांसाठी नवीन दिशा देणारे ठरले.
या शैैक्षणिक प्रदर्शनासाठी न्यू इंडिया एशुरन्स आणि केजेज् एज्युकेशनल इन्स्टिट्यूट हे सहप्रायोजक होते.
(प्रतिनिधी)
हवी कौशल्य अन् अनुभवाची जोड
केवळ एमबीए किंवा बीबीएची पदवी संपादन करून या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणे कठीण आहे. त्यासाठी या शिक्षणाला विविध कौशल्य आणि अनुभवाची जोड असायला हवी. करिअरच्या अनेक संधी असतात पण आत्मविश्वास आणि दुर्दम्य इच्छाशक्तीशिवाय संधीचे सोने करता येत नाही, असे प्रतिपादन सूर्यदत्ता गु्रप आॅफ इन्स्टिट्युटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांनी केले. ‘बीबीए व एमबीएनंतर करिअरच्या संधी’ या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. डॉ. चोरडिया म्हणाले, प्रत्येकाचे व्यक्तिमत्व, क्षमता, कामाची पद्धत, आकलन वेगळे असते. शिक्षणाला कसलीही मर्यादा राहिलेली नाही. जागतिक स्पर्धा निर्माण झाल्याने करिअरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. कौशल्य अंगी असलेल्यांसाठी ही संधी अधिक फायदेशीर आहे. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, बँक, आयटी, मल्टीनॅशनल कंपनी, एचआर अशा विविध क्षेत्रात करिअर करता येऊ शकते. पण पदवी संपादन करत असतानाच अॅनिमेशन, टॅली, आयटी, परकीय भाषा असे कमी कालावधीचे कोर्सेस करणेही आवश्यक आहे.
सध्याचे युग सुपर स्पेशलायझेशनचे
एकेकाळी कोणत्याही विषयाची डिग्री असली तरी नोकरी मिळवणे अवघड जात नव्हते. परंतु सध्याच्या काळात डिग्य्रांपेक्षा तुम्हाला नेमक कोणत्या विषयात विशेष कौशल्य प्राप्त आहे हे पाहीले जाते, असे मत सिंहगड बिझनेस स्कूलचे प्रा. विशाल गायकवाड यांनी मांडले.
प्रा. गायकवाड म्हणाले की १०वी-१२वी नंतर विद्यार्थ्यांनी त्यांचा नैसर्गिक कल पाहून पुढच्या करिअरची दिशा निवडावी. शिक्षण घेताना मान्यताप्राप्त संस्थांमध्येच प्रवेश घेवून फसवणूक टाळावी. आज विविध जाहिरातींमधून विद्याथ्यांची फसवणूक होते व विद्यार्थ्यांना पुढे नोकरी मिळण्यास अडचणी येतात. १०वी १२वी नंतर विद्यार्थी फॉर्मल शिक्षण म्हणजे बी.ए, बी.एस्सी, बी.कॉममध्येही वेगवेगळे करिअर करू शकतात. एआयसीटीने मान्यता दिलेले ५८७ कोर्स आहेत. पैकी कोणतेही आवडीचे डिप्लोमा, डिग्री कोर्स विद्यार्थी करू शकतात. मेडिकल, एमबीए, अॅग्रीकल्चर, अर्थशास्त्र प्रशासकीय सेवांमध्ये विद्यार्थी करिअर करू शकतात.
... तर कलही लक्षात येईल
प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्याला ज्या विषयाची आवड आहे त्यांचा जास्त अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे आपल्याला आपला कल लक्षात येतो आणि करिअर निवडण्यास मदत होते, असे मत विवेक वेलणकर यांनी व्यक्त केले. ‘१०वी नंतरच्या करिअरच्या संधी’ या विषयावर वेलणकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. १० वी नंतर आपल्याला कोणत्या विषयात जास्त आवड आहे. त्या क्षेत्राकडे विद्यार्थ्यांनी गेले पाहिजे. केवळ आपले मित्र-मैत्रीणींनी या शाखेची निवड केली म्हणून ते क्षेत्र निवडणे चूकीचे आहे. पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना जबरदस्ती करू नये किंवा दुसऱ्या मुलांची उदाहरणे देता कामा नये.
सायन्सच भारी असे विद्यार्थ्यांनी समजू नये. आर्टस या शाखेतून सुद्धा करिअरच्या अनेक वाटा विद्यार्थ्यांना खुल्या होतात. आर्टसची निवड केल्यानंतर विद्यार्थ्यांना अनेक वेगवेगळे आॅप्शन खुले होतात. यामध्ये फोटोग्राफी, फाईन आर्टस, फॅशन डिझाइनिंग, डी.एड, अॅनिमेशन, इंटेरिअर डिझाईन, मास कम्युनिकेशन अँड मास मीडिया, फॉरेन लँग्वेज, मुलींना तर १० वी नंतर होम सायन्ससारखा एक चांगला कोर्स उपलब्ध झाला आहे.
१० वी नंतर कॉमर्स या शाखेची निवड केल्यानंतर विद्यार्थ्यांना सी.ए, सी.एस, बी.सी.ए, सी.डब्ल्यू.ए, फॉरेन्सींग अकाऊटींग असे विविध पर्याय विद्यार्थ्यांसमोर खुले आहेत.
कौशल्याचा शोध घ्यावा
आपल्या पाल्यामध्ये कोणते कौशल्य आहे, याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे. यामुळे पाल्याच्या कल ओळखून त्याला कोणती शाखा निवडायची आहे हे देखील समजण्यास मदत होईल, असे मत सत्यजित कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
‘कौशल्य विकास संधी आणि आव्हाने’ या विषयावर कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कुलकर्णी म्हणाले, पालकांनी आपल्या मुलांच्या क्षमतांचे मॅपिंग केले पाहिजे आणि त्यांना करिअर निवडण्यास मदत केली पाहिजे. मुलांनीसुद्धा आपल्याला कोणत्या क्षेत्रात आवड आहे, हे पालकांना ठासून सांगितले पाहिजे. मुलांनी बीए. बी.कॉम या क्षेत्राला कमी न लेखता या बरोबर कोणते अपारंपरिक कोर्स करता येतील, याकडे लक्ष दिले पाहिजे. यामुळे मुलांचे भविष्य सुंदर तर होतेच त्याचबरोबर पगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील.
भारतामध्ये ज्या व्यक्तीमध्ये कौशल्ये आहे, त्याला जास्त प्रमाणात प्रतिष्ठा मिळत नाही. पण काही देशांतील लोकांमध्ये कोणत्याना कोणत्या प्रकारचे कौशल्य असते, असे ते म्हणाले.
शोध, नवनिर्मितीतून मानवाची प्रगती
सृजनशीलता ही मानवाच्या विविध गुणांपैकी असलेली महत्त्वाची बाब आहे. आपल्या याच गुणांचा वापर मानवाने स्वत:च्या प्रगतीसाठी केला आहे. सतत नव्याचा शोध आणि नवनिर्मितीचा ध्यास यातूनच मानवाची सातत्याने प्रगती झाली आहे, असे मत सृजन इन्स्टिट्यूट आॅफ गेमिंग मल्टिमीडिया अॅनिमेशनचे संस्थापक संचालक संतोष रासकर यांनी व्यक्त केले. रासकर म्हणाले, संगणक आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या या युगात या सृजनशीलतेचा मानवाने नव्या उद्योगांसाठी मोठ्या खुबीने वापर केला आहे आणि त्यातूनच उद्योगाचे विश्व उभे राहिले आहे. मानवाच्या विविध गरजा या क्षेत्रातून पूर्ण होतात. मनोरंजनापासून ते प्रत्येक उद्योगाच्या आवश्यक अशा सादरीकरणापर्यंत या माध्यमाशिवाय पर्याय नाही. म्हणूनच उद्योग जगताच्या या क्षेत्राने मागील काही वर्षांत अशी भरारी घेतली आहे, की दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रापेक्षा या क्षेत्रात करिअरच्या संधी अधिक खात्रीशीर आहे. नक्कीच डिझायनिंग क्षेत्रातील करिअर हे आज सर्वांसाठी एक सुवर्णसंधी आहे.
भारतीय लोकांच्या अंगी असलेली मूळ क्षमता जर कोणती आहे तर ती सृजनशीलता. त्यामुळे सृजनशीलतेची गरज असलेल्या या उद्योग जगतासाठी भारत जगाची पसंती ठरला आहे.