मध्यान्ह भोजन कंत्राटावरून नवा वाद

By admin | Published: July 13, 2017 02:12 AM2017-07-13T02:12:40+5:302017-07-13T02:12:40+5:30

५० हजार विद्यार्थ्यांना मोफत पोषक आहार पुरवण्यासाठी अक्षय पात्र या संस्थेला पवईतील ३० हजार चौरस फूट क्षेत्रफळाची जागा देण्यात येत आहे

New dispute from mid-day meal contract | मध्यान्ह भोजन कंत्राटावरून नवा वाद

मध्यान्ह भोजन कंत्राटावरून नवा वाद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पालिका शाळांमधील सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांना मोफत पोषक आहार पुरवण्यासाठी अक्षय पात्र या संस्थेला पवईतील ३० हजार चौरस फूट क्षेत्रफळाची जागा देण्यात येत आहे. मात्र गटनेत्यांच्या बैठकीत झालेल्या या निर्णयावर पहारेकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईत ही एकमेव संस्था आहे का? असा आक्षेप विरोधी पक्षांबरोबरच भाजपानेही घेतला आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपामध्ये वादाचा एक नवीन मुद्दा समोर येणार आहे.
मध्यान्ह भोजनाच्या पुरवठ्याकरिता या संस्थेला स्वयंपाकगृहासाठी जागा देण्याचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत मंजुरीसाठी आला होता. ही जागा या संस्थेला मोफत देण्यात येणार आहे. ५० हजार मुलांचे भोजन बनवण्यासाठी या जागेचा वापर केला जाणार आहे. मात्र प्रथम पाच हजार विद्यार्थ्यांना भोजनाचे वाटप करण्यात येणार आहे, त्यानंतर टप्प्याटप्प्याने ५० हजार मुलांना पोषक आहार देण्यात येणार आहे. फक्त पाच हजार मुलांना पोषण आहार पुरवण्यासाठी ३० हजार चौरस फुटांची जागा या संस्थेच्या घशात घातली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.
पश्चिम उपनगरांतील एका पंचतारांकित हॉटेलमधील ही ३० हजार चौरस फूट जागा ‘सेंट्रल किचन’ म्हणून वापरण्यात येणार आहे. मात्र या कामाच्या निविदा का मागवल्या नाहीत, या जागेचा भविष्यात व्यावसायिक वापर कशावरून होणार नाही, असे प्रश्न उपस्थित करत काँग्रेसने या प्रस्तावाला विरोध केला आहे. तर भाजपानेही या प्रकरणी जाब विचारला आहे. मात्र या विरोधानंतरही सत्ताधारी शिवसेनेने हा प्रस्ताव बहुमताने मंजूर केला.
>तीस हजार फुटांचे ‘किचन’
पालिकेतील विद्यार्थ्यांना भोजन देण्यासाठी पश्चिम उपनगरांतील एका हॉटेलच्या ३० हजार चौरस फूट जागेचा सेंट्रल किचन म्हणून वापर करण्यात येणार आहे. या जागेचा वापर ‘किचन’ म्हणून सुरू आहे तोपर्यंतच ही जागा संस्थेला मिळणार आहे. या संस्थेने तीन महिन्यांनंतर
५० हजार विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन मोफत देण्याची तयारी दाखवली आहे. मात्र अशा प्रकारे जागा देण्यासाठी जाहिरात काढून त्याचे वाटप करणे अपेक्षित असल्याचे मत रवी राजा यांनी व्यक्त केले.

5000 मुलांचे भोजन बनवण्यासाठी ३० हजार चौरस फुटांची जागा देण्याची कल्पना आपल्याला मान्य नाही. संपूर्ण मुंबईत केवळ ही एकमेव संस्था आहे का? की कोणी महापालिकेकडे येत नाही? याचा खुलासा करण्याची मागणी केल्याचे भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी सांगितले. इतर संस्थांकडूनही अंदाज घेऊन हा निर्णय घेतला जावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

Web Title: New dispute from mid-day meal contract

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.