४० वर्षांनी क्षयासाठी नवे औषध
By admin | Published: February 24, 2016 01:36 AM2016-02-24T01:36:19+5:302016-02-24T01:36:19+5:30
औषधाला दाद न देणाऱ्या क्षयरोगाची समस्या जगभरात वाढत आहे. टीबीला आळा घालण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू असूनही, ‘मल्टि ड्रग्ज रजिस्टंट’ (एमडीआर), ‘एक्स्टेंसिव्हली ड्रग्ज रजिस्टंट
मुंबई : औषधाला दाद न देणाऱ्या क्षयरोगाची समस्या जगभरात वाढत आहे. टीबीला आळा घालण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू असूनही, ‘मल्टि ड्रग्ज रजिस्टंट’ (एमडीआर), ‘एक्स्टेंसिव्हली ड्रग्ज रजिस्टंट’ (एक्सडीआर) या क्षयरोग रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आता तब्बल ४० वर्षांनी आलेले ‘बेडाक्विलिन’ हे औषध टीबी रुग्णांसाठी आधार ठरणार आहे. केईएम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एक्सडीआर क्षयरोगींंना हे औषध देण्यात येणार असल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी ‘लोकमत’ दिली.
क्षयरोगावर उपचारासाठी १३ औषधे उपलब्ध आहेत, पण त्यास क्षयरोगाचे जंतू दाद देईनासे झाले आहेत. त्यामुळे क्षयरोगाला आळा घालण्यासाठी तब्बल ४० वर्षांनी नवीन औषध तयार करण्यात आले आहे. केईएम रुग्णालयाबरोबर हे औषध शिवडी क्षयरोग रुग्णालयातील एक्सडीआर रुग्णांनाही दिले जाणार आहे. (प्रतिनिधी)
बेडाक्विलिनचे फायदे
या औषधाची सकारात्मक बाब म्हणजे हे औषध रक्तात ५ ते ६ महिने राहते. सध्या वापरली जाणारी औषधे काहीच दिवस रक्तात राहतात, त्यामुळे या औषधांचा रुग्णांना गुण कमी येतो. नवीन औषधामुळे दाद न देण्याचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा आहे.