शिंदे सरकारबाबत नवा पेच; सत्ता स्थापनेबाबतच्या पाठिंब्याची कागदपत्रे राज्यपाल सचिवालयाकडे नाहीत
By नारायण जाधव | Published: August 25, 2022 03:44 PM2022-08-25T15:44:03+5:302022-08-25T15:44:53+5:30
दोन्ही पक्षांनी एकमेकांना सत्ता स्थापण्याबाबत पाठिंबा देण्याविषयी कागदपत्रे दिलेली नसतील तर मग, सरकार स्थापनेसाठी राज्यपालांनी कोणत्या मुद्याच्या आधारे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना पाचारण केले, असा प्रश्न जाधव यांनी केला आहे.
नवी मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्याबाबत शिवसेनेच्या कार्यकारी मंडळाच्या ठरावाची वा भारतीय जनता पक्षाने सरकार स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबतच्या ठरावाची कागदपत्रे राज्यपालांच्या सचिवालयाकडे उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
नवी मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांनी माहिती अधिकारांतर्गत चार प्रश्न विचारून ही कागदपत्र मागविली होती. त्यावर राज्यपाल सचिवालयातील सामान्य माहिती अधिकारी विक्रम निकम यांनी सदरहू मुद्यांची माहिती आमच्या कार्यालयात उपलब्ध नसल्याचे उत्तर त्यांना दिले आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांना सत्ता स्थापण्याबाबत पाठिंबा देण्याविषयी कागदपत्रे दिलेली नसतील तर मग, सरकार स्थापनेसाठी राज्यपालांनी कोणत्या मुद्याच्या आधारे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना पाचारण केले, असा प्रश्न जाधव यांनी केला आहे.
कोणती माहिती मागविली होती
१- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्याबाबत शिवसेनेच्या कार्यकारी मंडळाने मंजूर केलेल्या व विधानसभा सचिवालयात सादर केलेल्या अधिकृत ठरावाची छायांकित प्रमाणित प्रत मिळावी.
२- शिवसेनेने विधानसभा सचिवालयात भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्याबाबत दिलेल्या पत्राची छायांकित प्रमाणित प्रत मिळावी.
३- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेने भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्याबाबत भाजपच्या कार्यकारी मंडळाने मंजूर केलेल्या व विधानसभा सचिवालयात सादर केलेल्या अधिकृत ठरावाची छायांकित प्रमाणित प्रत मिळावी.
४ - भाजपने विधानसभा सचिवालयात शिवसेनेला महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्याबाबत दिलेल्या पत्राची छायांकित प्रमाणित प्रत मिळावी.
या सर्व प्रश्नांवर राज्यपाल सचिवालयातील सामान्य माहिती अधिकारी विक्रम निकम यांनी सदरहू माहिती या कार्यालयात उपलब्ध नाही, असे उत्तर माहिती अधिकारांतर्गत दिले आहे.
दुसऱ्या एका अर्जाद्वारे संतोष जाधव यांनी राज्यपालांच्या कार्यालयाकडे २०२२ मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी आणि बहुमत सिद्ध करण्यासाठी भारतीय जनता पक्ष किंवा इतर पक्षास राज्यपालांनी दिलेल्या पत्राची छायांकित प्रमाणित प्रत मागितली होती. मात्र, ही कागदपत्रे राज्यपालांकडेच असून सचिवालयाकडे अद्याप उपलब्ध नसल्याचे उत्तर विक्रम निकम यांनी दिले आहे.
राज्यपाल सचिवालयाने दिलेल्या या माहितीनंतर आता राज्यातील एकनाथ शिंदे सेना, भाजप आणि महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.