अकरावी प्रवेशाची नवी संधी
By Admin | Published: July 25, 2016 04:46 AM2016-07-25T04:46:39+5:302016-07-25T04:46:39+5:30
अकरावीच्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश निश्चित न केलेल्या (नॉट रिपोर्टेड) विद्यार्थ्यांना सोमवारी व मंगळवारी प्रवेशाची दुसरी संधी मिळणार आहे
मुंबई : अकरावीच्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश निश्चित न केलेल्या (नॉट रिपोर्टेड) विद्यार्थ्यांना सोमवारी व मंगळवारी प्रवेशाची दुसरी संधी मिळणार आहे. सुमारे ७० हजार नॉट रिपोर्टेड विद्यार्थ्यांनी ज्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित केला नव्हता, त्यांना रिक्त जागांची संख्या पाहून त्याच महाविद्यालयात प्रवेश देण्याचे मेसेजेस पाठवण्यात येणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आॅनलाइनचा लॉगीन आणि त्यावर नोंदणीकृत केलेला मोबाइल क्रमांक तपासावा, असे आवाहनही उपसंचालक कार्यालयाने केले आहे.
सोमवारी व मंगळवारी मेसेज आल्यानंतर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करायचा आहे. सर्वच विद्यार्थ्यांना मेसेजेस येणार नाहीत, असेही उपसंचालक कार्यालयाने सांगितले. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना मेसेजेस येणार नाहीत, त्यांना ९ आॅगस्ट रोजी होणाऱ्या पहिल्या विशेष फेरीमध्ये आणखी
एक संधी देण्यात येईल. त्यामुळे मेसेजेस आले नाहीत, म्हणून नॉट रिपोर्टेड विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी गोंधळून जाऊ नये, असे उपसंचालक कार्यालयाने स्पष्ट केले. २८ जुलैला सर्व महाविद्यालये त्यांच्याकडे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे अपलोडिंग करतील. त्यानंतर, रिक्त जागांची निश्चित आकडेवारी समोर येईल.
या आधी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत अर्धवट अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना आत्ता अर्ज पूर्ण भरण्याची संधी दिली जाईल. सुमारे १ हजार २०० विद्यार्थ्यांनी अर्धवट अर्ज भरले होते. ३० जुलै ते २ आॅगस्ट दरम्यान विद्यार्थ्यांना अर्धवट राहिलेले अर्ज पूर्ण भरता येतील. त्यानंतर या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी पाचवी गुणवत्ता यादी ४ आॅगस्टला जाहीर केली जाईल. गुणवत्ता यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना ५ व ६ आॅगस्ट रोजी संबंधित कनिष्ट महाविद्यालयांत प्रवेश निश्चित करता येईल, तर या फेरीत ज्या विद्यार्थ्यांचे नाव जाहीर होणार नाही, त्यांना ९ आॅगस्ट रोजी जाहीर होणाऱ्या पहिल्या विशेष फेरीत सामील केले जाईल. एकंदरीतच नॉट रिपोर्टेड विद्यार्थ्यांमधून शिल्लक राहणारे विद्यार्थी आणि पाचव्या फेरीत ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळणार नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांना पहिल्या विशेष फेरीत प्रवेशाची आणखी एक संधी मिळणार आहे, तर ज्या विद्यार्थ्यांना दूरचे महाविद्यालय मिळाले आहे, त्यांच्यासाठी तीन विशेष फेऱ्यांचे आयोजन केले. (प्रतिनिधी)