नवा प्रयोग; शंख निनाद करीत पोलिसांचे वाहतुकीचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 02:45 PM2019-07-15T14:45:35+5:302019-07-15T14:48:28+5:30
पंढरपूर : वाहतुकीला शिस्त लावणारे किंवा एखाद्या चौकात गर्दी झाल्यास शिट्टी वाजवून वाहतूक सुरळीत करणारे पोलीस पंढरपुरात आल्यानंतर भक्तीत ...
पंढरपूर : वाहतुकीला शिस्त लावणारे किंवा एखाद्या चौकात गर्दी झाल्यास शिट्टी वाजवून वाहतूक सुरळीत करणारे पोलीस पंढरपुरात आल्यानंतर भक्तीत तल्लीन होत शंख वाजवित होते़ हे पाहून ये-जा करणारे भाविक म्हणाले, एरव्ही शिट्टी वाजविणारे पोलीस आज शंख निनाद करू लागले आहेत.
आषाढी वारी सोहळ्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येतात. चंद्रभागेत पवित्र स्नान केल्यानंतर दर्शन रांगेतून श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे दर्शन घेतात. त्यानंतर गावी परत जाताना पांडुरंगाचा प्रसाद घेतातच. एकीकडे भाविकांची गर्दी झालेली असली तरी दुसरीकडे छोटे-मोठे व्यावसायिक मिळेल त्या ठिकाणी स्टॉल उभारून विक्री करीत असतात. त्यात चुरमुरे, कुंकू, बुक्का, शंख, विभूती, अष्टगंध, अगरबत्ती, घंटा, मूर्ती यांचा समावेश असतो़ पंढरीत आलेले भाविक हे साहित्य देवाची पूजा करताना लागतात म्हणून खरेदी करतात़ शिवाजी चौक ते सावरकर चौकदरम्यान स्टेशन रोड परिसरात असे अनेक स्टॉल उभारलेले दिसून येतात.
पंढरीत भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यासह बाहेरील पोलीस बंदोबस्त मागविण्यात येतो़ लातूर येथून अभंग साळुंखे, राजेंद्र साळुुंखे हे पंढरपुरात स्टेशन रोड परिसरात बंदोबस्तावर होते़ शंख स्टॉलवर ये-जा करणारे भाविक शंख वाजवून ते खरेदी करीत होते़ सर्वत्र भक्तिमय वातावरण असल्याने पोलिसांनाही शंख वाजविण्याचा मोह आवरला नाही़ अभंग साळुंखे यांनी शंख दुकानदाराकडे जाऊन शंख घेतला आणि जोरजोराने शंख वाजवू लागले.